ऑनलाईन टीम / मुंबई :
शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी दोन दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांचा 100 कोटींचा टॉयलेट घोटाळा (toilet scam) बाहेर काढणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर सोमय्या यांनी या प्रकरणात आपली बाजू मांडली आहे. सोमय्या यांनी या संदर्भात नगरविकास विभागाला आणि मिरा-भाईंदर महापालिकेच्या आयुक्तांना पत्र लिहिलं असून, त्यामध्ये हा 100 कोटींचा आकडा आला कुठून? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच राऊतांकडूनही याचे स्पष्टीकरण मागितले आहे.
सोमय्या यांनी पत्रात म्हटलं आहे की, भाजप, युवक प्रतिष्ठान, प्रा. मेधा सोमय्या आणि डॉ. किरीट सोमय्या यांनी कोणताही प्रकारचा टॉयलेट घोटाळा केला नाही. ज्या टॉयलेट घोटाळय़ाची चर्चा सध्या सुरू आहे ती घटना केव्हा झाली, त्या संबंधी स्पष्टता करावी. माझ्या माहितीप्रमाणे गेल्या 10 वर्षांत मीरा-भाईंदर महानगरपालिका किंवा पर्यांवरण मंत्रालय यांच्याकडून टॉयलेट किंवा कांदळवन अशा प्रकारचा कोणताही विषय, पत्र, प्रश्न आलेला नाही. किंबहुना 15 वर्षांत अशा प्रकारचा विषय झालेला दिसत / आठवत नाही. कोणत्याही विभागाचे असे एकही पत्र अथवा चौकशीही आमच्याकडे आलेली आठवत नाही. एका बाजूला टॉयलेटसंबंधी खोटी कागदपत्रे दाखवून रु 3,90,52,000 ची बिले घेतली असा उल्लेख केला जातो. त्याचसोबत 100 कोटींचा घोटाळा याचाही उल्लेख होत असतो याची दखल घ्यावी व स्पष्टता करावी.
काय म्हणाले होते संजय राऊत?
संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर 100 कोटींच्या टॉयलेट घोटाळ्याचा आरोप केला आहे. मिरा-भाईंदर शहरात एकूण 154 सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली. त्यातील 16 शौचालये बांधण्याचे कंत्राट किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांना मिळालं. त्यांचं युवक प्रतिष्ठान आहे. यामार्फत हे कंत्राट मार्गी लावण्यात आलं. मात्र, बनावट कागदपत्रे सादर करून, पालिकेच्या अधिकाऱयांची फसवणूक करण्यात आली. शेकडो कोटींचा हा टॉयलेट घोटाळा असून, लवकरच तो बाहेर काढणार आहे.