चाकणमध्ये छेडछाडीचा जाब विचारल्याच्या कारणातून कृत्य
वार्ताहर/ वाठार किरोली
चाकण औद्योगिक वसाहतीमधील सावरदरी (ता. खेड) येथे महिलेच्या छेडछाडीचा जाब विचारायला गेलेल्या दोघांचा एकाने धारदार शस्त्राने खून केला. खून झालेले दोघेही मूळचे सातारा जिह्यातील किरोली (ता. कोरेगाव) येथील आहेत. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, संशयिताच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
सुरज नंदकुमार चव्हाण (वय 27, सध्या रा. सावरदरी) आणि अनिकेत किसन पवार (वय 24 वर्षे, सध्या रा. सावरदरी) अशी खून झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी छेडछाड केलेल्या महिलेच्या फिर्यादीवरून संशयित प्रदीप दिलीप भगत (सध्या रा. सावरदरी) याच्यावर म्हाळूंगे पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चाकण औद्योगिक वसाहतीमधील सावरदरी गावामध्ये खून झालेले सूरज, अनिकेत व संशयित प्रदीप भगत हे भाडेकरू म्हणून राहत आहेत. सूरज चव्हाण हा आपल्या कुटुंबासह राहत आहे. यापूर्वी संशयित प्रदीप हा फिर्यादीच्या शेजारील महिलेची वारंवार छेड काढत होता. प्रदीप याने शनिवारी त्या महिलेच्या बाथरूमची खिडकी फोडली. याचा जाब विचारण्यासाठी सूरज आणि अनिकेत हे प्रदीप याच्याजवळ गेले. यावरून तिघांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यावेळी प्रदीपने धारदार शस्त्राने सूरज व अनिकेत यांच्यावर सपासप वार केले. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. त्यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दिवसाढवळ्या खुनाचा थरार झाल्याने खळबळ उडाली होती. यादरम्यान संशयित प्रदीप हा पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच म्हाळुंगे पोलिसांनी धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. वरिष्ठ पोलिस अधिकायांच्या सूचनेनुसार खून करून पसार झालेल्या संशयिताच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.
नोकरीनिमित्त चाकण येथे वास्तव्यास असणाया सूरज चव्हाण याचा संसाराचा गाडा व्यवस्थित मार्गी लागला होता. यानंतर जीवाभावाचा मित्र असणाया अनिकेतला सूरजने चाकणला बोलावून तिथेच नोकरी शोधून मार्गी लावले होते. अचानक घडलेल्या या हत्याकांडामुळे दोन्ही कुटुंबं अक्षरशः हादरली असून किरोली गावावर शोककळा पसरली आहे. मयत सूरज याच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई व भाऊ असा परिवार आहे.