प्रतिनिधी /वास्को
गोवा शिपयार्ड प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉईज युनियनची सर्वसाधारण सभा काल बुधवारी नवेवाडे वास्को येथील साईबाबा मंदिराजवळील सेलेब्रेशन सभागृहात पार पडली. या सभेत या युनियनच्या अध्यक्षपदी किशोर बी. शेट यांची निवड करण्यात आली.
किशोर बी. शेट यांच्या नेतृत्वाखालील गोवा शिपयार्ड कामगार संघटनेचा प्रश्न न्यायप्रविष्ठ असून किशोर शेट यांच्या नेतृत्वाला काही कामगारांनी आव्हान दिलेले आहे. मात्र, गोवा शिपयार्डमध्ये नव्यानेच स्थापन झालेल्या गोवा शिपयार्ड प्राग्रेसिव्ह एम्प्लॉईज युनियन या कामगार संघटनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही किशोर शेट यांच्यावरच पडली आहे. या नव्या संघटनेचे अध्यक्ष विजय सातार्डेकर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या जागी किशोर शेट यांची निवड करण्यात आली. युनियनचे अध्यक्ष व उपाध्यक्ष या पदांवर नव्या नेत्यांची निवड करण्यासाठी ही सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. कामगारांनी अध्यक्ष व उपाध्यक्षपदी या नेत्यांची बिनविरोध निवड केली आहे.
उपाध्यक्षपदी विजय सातार्डेकर व विनय पेडणेकर, सरचिटणीसपदी हषिकेश घाडी, उपसरचिटणीपदी शुभम शेट तर खजिनदारपदी महादेव तांडेल यांची निवड करण्यात आली.
यावेळी कामगारांना मार्गदर्शन करताना किशोर शेट यांनी पुढील काही महिन्यात गोवा शिपयार्डमधील कामगारांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्यात येणार असल्याचे सांगितले. गोवा शिपयार्ड कामगार संघटनेचा प्रश्न न्यायप्रविष्ठ राहिल्याने आपल्याला बराच काळ कामगार संघटना व कामगारांच्या समस्यांमध्ये लक्ष घालता आले नाही. आता नवीन संघटनेच्या माध्यमातून आपण पुन्हा कामगारांसाठी कार्यरत राहणार असून कामगारांनी चिंता बाळगू नये असे आवाहन केले. गोवा शिपयार्डमध्ये मागच्या पंधरा वर्षांहून अधिक काळ कोणताही वाद किंवा तणाव निर्माण झालेला नाही. यापुढेही गोवा शिपयार्डमध्ये शांतताच राहिल. कामगारांचे प्रश्न सुरळीतरीत्या सोडवले जातील. आपल्या अनुपस्थितीच्या काळात गोवा शिपयार्डमध्ये नोकरभरतीच्या विषयात अन्यायकारक गोष्टी घडल्या आहेत काय याचीही चाचपणी नव्या कामगार संघटनेच्या माध्यमातून करण्यात येईल असे किशोर शेट यांनी स्पष्ट केले.