Tarun Bharat

‘कुलदीप मॅजिक’समोर केकेआरची त्रेधातिरपिट!

आयपीएल साखळी फेरी : दिल्ली कॅपिटल्सचा 6 चेंडू, 4 गडी राखून एकतर्फी विजय, हंगामातील चौथे यश, डेव्हिड वॉर्नर-रोव्हमन पॉवेलची फटकेबाजी

वृत्तसंस्था /मुंबई

कुलदीप यादव (14 धावात 4 बळी), मुस्तफिजूर रहमान (18 धावात 3 बळी) यांची भेदक गोलंदाजी आणि डेव्हिड वॉर्नर (42), रोव्हमन पॉवेल (नाबाद 33) यांच्या फटकेबाजीच्या बळावर दिल्ली कॅपिटल्सने येथील आयपीएल साखळी सामन्यात केकेआरचे मनसुबे पार धुळीस मिळवले. केकेआरला निर्धारित 20 षटकात 9 बाद 146 धावांवर रोखल्यानंतर दिल्लीने 19 षटकात 6 बाद 150 धावांसह सहज विजय संपादन केला. दिल्लीचा हा या हंगामातील चौथा विजय ठरला.

विजयासाठी 147 धावांचे आव्हान असताना दिल्लीतर्फे डेव्हिड वॉर्नरने 26 चेंडूत सर्वाधिक 42 धावांचे योगदान दिले तर रोव्हमन पॉवेलने 16 चेंडूत जलद 33 धावा फटकावल्या. पॉवेलनेच लाँगऑनच्या दिशेने उत्तुंग षटकार खेचत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

कुलदीप मॅजिकचा धमाका

प्रारंभी, कुलदीप यादवच्या जादुमय फिरकीसमोर कोलकाताची तगडी फलंदाजी लाईनअप कोसळत राहिली आणि त्यांना निर्धारित 20 षटकात 9 बाद 146 धावांवर समाधान मानावे लागले होते. केकेआरने या लढतीत अंतिम एकादशमध्ये अनेक बदल केले आणि याचा त्यांना बराच फटका बसला. श्रेयस अय्यर (37 चेंडूत 42) व नितीश राणा (34 चेंडूत 57) यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांनी बरीच निराशा केली.

राणा व रिंकू सिंग (16 चेंडूत 23) यांनी सातव्या गडय़ासाठी 62 धावांची भागीदारी साकारल्यामुळे केकेआरला आणखी नामुष्की टाळता आली. ही भागीदारी साकारली जाण्यापूर्वी एकवेळ केकेआरची 6 बाद 83 अशी पडझड झाली होती. यंदा सर्वोत्तम बहरात असलेल्या अनुभवी कुलदीपने 14 धावात 4 बळी घेतले आणि यात श्रेयस अय्यर व धोकादायक आंद्रे रसेलचा समावेश राहिला.

एकीकडे, कुलदीपने मधल्या षटकात केकेआरच्या डावाला सुरुंग लावल्यानंतर मुस्तफिजूर रहमानने (4 षटकात 3-18) आणखी धक्के दिले. त्याने शेवटच्या षटकात तर केवळ 2 धावा देत 3 बळी घेतले. कुलदीपने कौशल्यपूर्ण रितीने चेंडूला फ्लाईट देत प्रतिस्पर्धी फलंदाजांना सातत्याने चकवे दिले. मात्र, कर्णधार रिषभ पंतने त्याचा कोटा पूर्ण करवून न घेणे आश्चर्याचे ठरले. बाबा इंद्रजीत स्वस्तात बाद झाल्यानंतर सुनील नरेन देखील बॅकफूटवर खेळण्याच्या प्रयत्नात खाते न उघडता ड्रेसिंगरुममध्ये परतला.

बाबा इंद्रजीतचे 10 वर्षांनंतर आयपीएल पदार्पण, पण…

प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये सातत्याने खेळत असलेल्या अनुभवी बाबा इंद्रजीतला तब्बल 10 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गुरुवारी आयपीएल पदार्पणाची संधी मिळाली. मात्र, त्याला या संधीचे चीज करता आले नाही. येथे केवळ 8 चेंडूत 6 धावांवर तो कुलदीपच्या गोलंदाजीवर बाद झाला. कुलदीपच्या फ्लायटेड चेंडूवर त्याने डीपमधील पॉवेलकडे झेल दिला.

संक्षिप्त धावफलक

केकेआर : 20 षटकात 9 बाद 146 (नितीश राणा 34 चेंडूत 3 चौकार, 4 षटकारांसह 57, श्रेयस अय्यर 37 चेंडूत 4 चौकारांसह 42, रिंकू सिंग 16 चेंडूत 3 चौकारांसह 23. कुलदीप यादव 3 षटकात 4-14, मुस्तफिजूर रहमान 4 षटकात 3-18, चेतन साकरिया, अक्षर पटेल प्रत्येकी 1 बळी).

दिल्ली कॅपिटल्स : 19 षटकात 6 बाद 150 (डेव्हिड वॉर्नर 26 चेंडूत 8 चौकारांसह 42, रोव्हमन पॉवेल 16 चेंडूत 1 चौकार, 3 षटकारांसह नाबाद 33, अक्षर पटेल 17 चेंडूत 24. अवांतर 6. उमेश यादव 4 षटकात 3-24, हर्षित राणा, सुनील नरेन प्रत्येकी 1 बळी).

Related Stories

महाराष्ट्र केसरी आप्पालाल शेख यांचे निधन

Amit Kulkarni

आय लीग फुटबॉल स्पर्धा 12 नोव्हेंबरपासून

Patil_p

कुस्तीशौकिनांना हुरहूर राहुलच्या हुकलेल्या विजयाची

datta jadhav

19 सप्टेंबरपासून फुटणार आयपीएलचे फटाके!

Patil_p

सिडनी सिक्सर्सचा होल्डरशी तीन सामन्यांसाठी करार

Patil_p

सर्बियाचा डिजेरचे एटीपीवरील दुसरे जेतेपद

Patil_p