भारत-द. आफ्रिका यांच्यात आज पहिली टी-20, सलग 13 व्या विजयासाठी भारतीय संघ महत्त्वाकांक्षी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारत-द. आफ्रिका यांच्यात आज (गुरुवार दि. 9) पहिली टी-20 खेळवली जाणार असून कर्णधार केएल राहुल व कुलदीप यादव या पूर्ण मालिकेतून बाहेर फेकले गेले आहेत. केएल राहुल धोंडशिरेच्या दुखापतीमुळे खेळू शकणार नाही, असे कार्यकारिणीने जाहीर केले. त्याच्या गैरहजेरीत संघाच्या नेतृत्वाची धुरा रिषभ पंतकडे सोपवली गेली. अष्टपैलू हार्दिक पंडय़ा या मालिकेत उपकर्णधार असेल.
डावखुरा मनगटी फिरकीपटू कुलदीप यादवला मंगळवारी फलंदाजीचा सराव करताना उजव्या हाताला दुखापत झाली आणि यामुळे तो देखील मालिकेतून बाहेर फेकला गेला. या दोन्ही खेळाडूंऐवजी पर्यायी खेळाडूंची बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत कोणतीही घोषणा केली गेली नव्हती. आजच्या सलामी लढतीत ऋतुराज गायकवाड व इशान किशन सलामीला फलंदाजीला उतरण्याची शक्यता आहे.
वर्ल्डकपच्या धर्तीवर टीम ऑडिशन
आगामी टी-20 वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट संघ लंकेविरुद्ध या मालिकेत काही नवे प्रयोग राबवून पाहणार असल्याचे संकेत आहेत. भारतीय संघाने अलीकडे सलग 12 टी-20 सामने जिंकले असून आज त्यांना सलग 13 सामने जिंकण्याचा सर्वकालीन सर्वोत्तम विक्रम प्रस्थापित करता येईल. मात्र, पुढील 10 दिवसांच्या कालावधीत होणाऱया या मालिकेत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा संघाची जडणघडण करण्याच्या दृष्टीने अधिक भर असेल.
नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली यांना मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली असून केएल राहुल दुखापतीमुळे बाहेर फेकला गेला असल्याने पंतकडे नेतृत्वाची धुरा सोपवली गेली. फेब्रुवारीत श्रीलंकेविरुद्ध उत्तम कामगिरी करणारा श्रेयस अय्यर हा दुखापतग्रस्त सूर्यकुमार यादवऐवजी तिसऱया स्थानी उतरण्याची शक्यता आहे. रिषभ पंत व दिनेश कार्तिक यांच्यामुळे मधली फळी भक्कम असेल.
जलद गोलंदाजीची धुरा भुवनेश्वर कुमारसह डेथ ओव्हर्स स्पेशालिस्ट हर्षल पटेल, अवेश खान यांच्यावर असेल. उमरान मलिकऐवजी अर्शदीप सिंगला पदार्पणाची संधी मिळू शकते. रवी बिश्नोई, अक्षर पटेल यांना आपली बाजू भक्कम करण्याची या मालिकेत नामी संधी असणार आहे.
संभाव्य संघ
भारत ः रिषभ पंत (कर्णधार-यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, हार्दिक पंडय़ा, वेंकटेश अय्यर, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.
द. आफ्रिका ः तेम्बा बवुमा (कर्णधार), क्विन्टॉन डी कॉक (यष्टीरक्षक), रिझा हेन्ड्रिक्स, हेनरिच क्लासेन, केशव महाराज, एडन मॅरक्रम, डेव्हिड मिलर, लुंगी एन्गिडी, ऍनरिच नोर्त्झे, वेन पर्नेल, डेव्हॉन प्रिटोरियस, कॅगिसो रबाडा, तबरेझ शमसी, ट्रिस्टॅन स्टब्ज, रॅस्सी व्हान डेर डय़ुसेन, मार्को जान्सन.
सामन्याची वेळ ः सायं. 7 वा.
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्स नेटवर्क
2010 नंतर आफ्रिकेचा भारतात एकही पराभव नाही
दक्षिण आफ्रिकेने 2010 नंतर भारतात मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारातील एकही मालिका गमावलेली नाही. तीच घोडदौड या मालिकेतही कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. डेव्हिड मिलर, क्विन्टॉन डी कॉक, एडन मॅरक्रम हे दक्षिण आफ्रिकेचे अव्वल खेळाडू असतील. फिरकी गोलंदाजीत तबरेझ शमसी व केशव महाराज तर जलद गोलंदाजीत कॅगिसो रबाडा व ऍनरिच नोर्त्झे यांच्यावर मुख्य जबाबदारी असेल. मागील वर्षातील वर्ल्डकपनंतर दक्षिण आफ्रिकन संघासाठी टी-20 क्रिकेटमध्ये ही पहिलीच मालिका असणार आहे.