प्रतिनिधी /बेळगाव
ज्या मुलांमध्ये रक्ताची निर्मिती होत नाही अशा मुलांना सतत रक्ताची आवश्यकता असते. शिवाय अपघाताच्या परिस्थितीत रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी रक्त अत्यावश्यक असते. त्यामुळे रक्तदान करुन इतरांचे जीव वाचविण्याचे आवाहन केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्राचे निर्देशक डॉ. एम. व्ही. जाली यांनी केले.
केएलई हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक युवा रेडक्रॉस संस्था आणि थॅलेसेमिया केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विश्व थॅलेसेमिया दिनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. रक्तदान सर्वात श्रे÷ दान आहे. रक्तदान करण्यास तुमच्या मित्रांना सांगा. रेडक्रॉस संस्थेशी केएलईच्या डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलने करार केला असल्याचेही त्यांनी सांगितले.
बालरोगतज्ञ डॉ. सुजाता वाली यांनी रुग्णालयात 240 थॅलेसेमियापीडित मुले असून त्यांचा मोफत इलाज आणि बोन मेरो केले जात आहे, असे सांगितले. दररोज 22 युनिट रक्त थॅलेसेमियाग्रस्त मुलांना दिले जाते. समाजाला काहीतरी द्या. तुम्ही रक्तदान करा तुम्हाला पाहून इतर लोक रक्तदान करतील, रक्तदानामुळे जीव वाचतो, असे रेडक्रॉस संस्थेचे अशोक बदामी म्हणाले.
कार्यक्रमाला ब्लड बँकेचे प्रमुख डॉ. एस. व्ही. विरगी, डॉ. राजेश पोवार, डॉ. विश्वनाथ पट्टणशेट्टी, डॉ. आरिफ मालदार आणि रेड क्रॉस संस्थेचे विद्यार्थी उपस्थित होते.