Tarun Bharat

सीएमपी प्रणालीद्वारे होणार शिक्षकांचे पगार

प्रशासक संजयसिंह चव्हाण यांची माहिती : जि. प. कडे अनुदानाची रक्कम जमा झाल्यानंतर दोन दिवसांत होणार पगार

प्रतिनिधी/कोल्हापूर

जिल्हा परिषदेने सर्व प्राथमिक शिक्षकांचे दरमहाचे वेतन ‘झेडपीएफएमएस’ मधून ‘सीएमपी’ प्रणालीद्वारे देण्याची कार्यवाही केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेकडे कोषागारातून अनुदानाची रक्कम प्राप्त झाल्यानंतर दोन दिवसांत जिह्यातील प्रत्येक शाळेतील शिक्षकांना पगार मिळणार असल्याची माहिती प्रशासक संजयसिंह चव्हाण यांनी दिली.

प्रशासक चव्हाण म्हणाले, जिह्यात एकूण 1 हजार 958 प्राथमिक शाळा 7 हजार 553 शिक्षक संख्या आहे. तर मेन राजाराम हायस्कूल , एम. आर. हायस्कुल, गडहिंग्लज, परशुराम विदयामंदीर गगनबावडा या तीन माध्यमिक शाळांकडे 46 शिक्षक कार्यरत असून त्यांचे वेतन करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेची आहे. शासनामार्फत वेतनासाठी अनुदान आल्यानंतर कोषागारामार्फत ते मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्याकडे जमा होते. सदर अनुदान वित्तप्रेषनाव्दारे सर्व गट विकास अधिकाऱयांना पाठविले जाते. शिक्षकांचे शालार्थ प्रणाली मार्फत वेतन करण्याची कार्यवाही सन 2015 पासुन सुरु आहे. शालार्थमध्ये माहिती भरण्याचे काम प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक करत असतात. त्यांच्या मार्फत सदर देयके गट शिक्षणाधिकारी यांच्या कडे सादर केली जातात. गट शिक्षणाधिकारी ही देयके गट विकास अधिकारी यांच्याकडे सादर करतात. गट विकास अधिकाऱयांकडून केंद्र शाळांना धनादेश दिले जातात. केंद्र शाळांमार्फत मुख्याध्यापकांच्या खात्यावर सदर वेतन पाठवून मुख्याध्यापक सदर यादी करून शिक्षकांच्या खात्यावर वेतनाची रक्कम जमा करतात. या प्रक्रियेमुळे प्रत्यक्षात शिक्षकांच्या खात्यावर वेतनाची रक्कम जमा होण्यास विलंब होत असल्यामुळे शासनाने सीएमपी प्रणालीद्वारे थेट शिक्षकांच्या खात्यावर पगाराची रक्कम जमा करण्याबाबत निर्देश दिले होते. शिक्षक संघटनांही त्यासाठी आग्रही होत्या.

त्यामुळे एप्रिल 2022 चे वेतन सीएमपी प्रणालीद्वारे करण्यासाठी जिल्हा परिषदेचे प्रशासक संजयसिंह चव्हाण यांनी निर्धार केला होता. त्यानुसार शिक्षण विभाग (प्राथमिक) आणि वित्त विभाग यांनी शर्थीचे प्रयत्न करून हा निर्धार तडीस लावला. शिक्षकांची मोठी संख्या आणि महिन्याला होणारा सुमारे 60 कोटी इतका खर्च लक्षात घेता शिक्षकांच्या खात्यावर पगार जमा करण्याची जोखीम देखील मोठी होती. ही जोखीम कमी करण्यासाठी कमी शिक्षक संख्या असलेला गगनबावडा तालुका पथदर्शी प्रकल्प म्हणून निवडला. या तालुक्यातील शिक्षकांच्या खात्यावर 1 रूपयांचे वेतन करण्यात आले. यामध्ये समाधानकारकरित्या खात्री झाल्यानंतर गगनबावडा तालुक्याचे संपुर्ण वेतन आदा करण्यात आले. याच पध्दतीने उर्वरित 11 तालुक्यांचे वेतन करण्यात आले. यापुढे कोषागारातून अनुदानाची रक्कम जिल्हा परिषदेला प्राप्त झाल्यानंतर दोन दिवसांत शिक्षकांच्या खात्यावर पगार जमा होणार असल्यामुळे जिह्यातील शिक्षकांकडून समाधान व्यक्त केले जात असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

Related Stories

राज्य शासनाने दीर्घ मुदतीचे बिनव्याजी कर्ज द्यावे

Archana Banage

धामणी खोऱ्यात सापडले दोन कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

उचगावमध्ये दलित महासंघातर्फे प्राधिकरणाच्या कारभाराची होळी

Archana Banage

कोल्हापूर : जिल्हय़ात ५३४ बाधित,१३ बळी

Archana Banage

सुतारवाडय़ावर दरवर्षीच स्थलांतराची वेळ

Kalyani Amanagi

गहुंजे क्रिकेट स्टेडियममध्ये घुसले शिवदुर्ग संवर्धन आंदोलन कार्यकर्ते

Archana Banage