क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
उडुपी येथे कर्नाटक राज्य ऍथलेटीक्स असोसिएशन व उडुपी जिल्हा अमॅच्युअर ऍथटलेटीक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कर्नाटक राज्यस्तरीय अमॅच्युअर ऍथलेटीक्स स्पर्धेत येथील गर्लगुंजीचा धावपटू विश्वंभर कोलेकरने 800 मीटर व 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदके पटकावली.
800 मीटर धावण्याची शर्यत विश्वंभर कोलेकरने 1.52 मिनिटात पूर्ण करीत सुवर्णपदक पटकाविले. कुर्गचा देवय्या टीएम ने 1.54 मिनिटाचा अवधी घेत रौप्य तर उडुपीच्या मिलनने (1.55 मिनिट) कांस्यपदक पटकाविले. त्याचप्रमाणे 1500 मीटर शर्यत विश्वंभरने 3.56 मिनिटात पूर्ण करून सुवर्ण तर म्हैसूरच्या राहुल चौधरीने (4.01) रौप्य व उडुपीच्या चेतन केएन ने (4.10) कांस्यपदक पटकाविले.
विश्वंभरने यापूर्वीही राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत अनेक पदके पटकाविली आहेत. तो सध्या बेंगळूर येथे दक्षिण पश्चिम रेल्वे येथे सहाय्यक टीसी म्हणून कार्यरत असून, कंटीरवा स्टेडियमवर तो नियमीत सराव करीत आहे. त्याला ऍथलेटीक्स प्रशिक्षक मुरलीधरन व आयप्पा यांचे मार्गदर्शन लाभत असून वडील लक्ष्मण कोलेकर यांचे लहानपणापासूनच प्रोत्साहन लाभत आहे.