स्थानिक मल्ल्यांचा चपळ व नेत्रदिपक विजय
कसबा बीड /प्रतिनिधी
धोंडेवाडी तालुका करवीर येथे जय बजरंग तालीम मंडळ व सर्व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने हनुमान जयंतीनिमित्त भव्य निकाली कुस्त्यांचे मैदान पार पडले. या कुस्त्यांमध्ये अनिरुद्ध पाटील यांनी धोबीपछाड डावाने रणवीर पाटील यास 20 सेकंदात चितपट करून पहिल्या क्रमांकाची कुस्ती जिंकली. तर हृदयनाथ पाचाकटेकडून दुहेरी हप्ता या डावाने 40 सेकंदात 2 नंबरची कुस्ती जिंकली. 3 नंबर कुस्तीसाठी प्रवीण पाटील या पैलवानाने एकेरी पट डावाचा ताबा घेत हप्ता डाव करून बबलू पाटील यास चितपट केले. तसेच आमशी व इतर स्थानिक मल्लांनी चपळतेने व नेत्रदीपक विजय मिळवत भव्य निकाली कुस्ती मैदान गाजवले.
या भव्य निकाली कुस्ती मैदानामध्ये मोठ्या गटांमध्ये प्रमुख पाच कुस्त्या झाल्या. यामध्ये पहिल्या क्रमांकासाठी रोख 25 हजार रुपये व शील्ड देऊन करवीर पंचायत माजी सभापती व विद्यमान सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, कुंभी कासारी साखर कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन व सदस्य दादासो लाड, कोल्हापूर जिल्हा मार्केट कमिटी संचालक बाबुराव खोत,ग्रामपंचायत सरपंच पांडुरंग नलवडे,यांच्या हस्ते तर द्वितीय क्रमांक रोख 20000 रुपये व शील्ड देऊन पोलीस पाटील जनार्दन मेढे, गणेशवाडी तंटामुक्त अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण, प्रहार संघटनेचे मयुर वरुटे, प्रकाश नलवडे यांच्या हस्ते, तृतीय क्रमांकासाठी रोख 15000 व शील्ड उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देऊन विजयी मल्लांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कुंभी संचालक दादासो लाड यांनी सुरवातीला 1985 मध्ये गणेशवाडी येथे कुस्ती मैदान झाले होते, आज धोंडेवाडी येथे कुस्ती मैदान घेऊन एक वेगळा पायंडा पडला व त्यासाठी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी या मैदानासाठी व धोंडेवाडी गावाच्या विकासासाठी नेहमीच पुढाकार घेतला याबद्दल आभार त्यांचे व्यक्त केले. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, तरुण वर्ग अध्यक्ष रोहित नलवडे, अशोक नलवडे व इतर सर्व युवा वर्ग, ग्रामस्थ या सर्वांच्या सहकार्याने हे कुस्ती मैदान संपन्न झाले. या कुस्ती मैदानाची संयोजक जय बजरंग तालीम मंडळ, धोंडेवाडी सर्व ग्रामस्थ , या मैदानासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व मल्लांचे व मान्यवरांचे सरपंच पांडुरंग नलवडे यांनी ग्रामपंचायतच्या वतीने आभार व्यक्त केले.