गोकुळ शिरगाव/वार्ताहर
कागल पंचतारांकित वजन काट्यात बदल करून अथवा खोट्या वजन पावत्यांच्या आधारे औद्योगिक वसाहतीतील न्यू मेल्टिंग सेंटर प्रा. लि. या कंपनीत 20 – 21 व 21- 22 या दोन आर्थिक वर्षात 6 कोटी 97 लाख रुपयांना गंडा घातल्याचे लेखापरीक्षण अहवालात आढळून आले. असून याप्रकरणी सहा सीआय कास्ट आयर्न बोरिंग मालपुरवठादार व दोन वे ब्रिज मालक अशा आठ जणांविरुद्ध गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अबूबकर दिलावर शेख (रा. वाय पी पवार नगर ,कोल्हापूर) यांच्या कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील प्लॉट नंबर एफ ११ न्यू मेल्टिंग सेंटर या कंपनीस अब्दुल गफार सिद्धीक कच्छी व अमीर अब्दुल गफार कच्छी दोघे (रा. ताराबाई पार्क, कोल्हापूर), आनंदा बाळू शिंदे (रा. कुशिरे ता. पन्हाळा), परशुराम बापू गायकवाड व गणेश परशुराम गायकवाड (दोघे रा. पेठ वडगाव ता. हातकणंगले) पांडुरंग कुंभार (रा. राधानगरी) हे पुरवठादार सीआय बोरिंग कास्टिंग या कच्च्या मालाचा पुरवठा करीत होते. सुरुवातीस बरोबर माल देऊन नंतर श्री साई समर्थ वे ब्रिज चे मालक तुषार अशोक सूर्यवंशी (रा. गोकुळ शिरगाव) व 5 स्टार महात वे ब्रिज चे मालक वसिम आक्रम महात यांच्याशी संगणमत साधत वजन काट्यामध्ये बदल करून २०२० – २१ व २१ – २२ या दोन आर्थिक वर्षात वेळोवेळी सीआय (कास्ट आयर्न) बोरिंग मालपुरवठा करताना अपहार केला. परंतु लेखापरीक्षण अहवालात सहा कोटी ९७ लाख रुपयांच्या एकूण १७०० टन मालाचा कमी पुरवठा झाल्याचे कंपनीचे लेखापरीक्षकांच्या निदर्शनात आल्यानंतर वरील सहा पुरवठादार व दोन वजन काट्यांचे मालक यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद झाला असून या प्रकरणी अधिक तपास गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश माने करीत आहेत.
हे ही वाचा : Kolhapur : प्रयाग चिखली, आंबेवाडी येथील ग्रामस्थांचे स्थलांतर सुरूच