Tarun Bharat

Kolhapur; दूध संस्थांकडून प्रतिलिटर दुधामागे आठ रुपयांचा डल्ला

संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांचा आरोप; दूध उत्पादक शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक; तरुण भारतच्या वृत्तानंतर मिल्को टेस्टर,वजन काट्य़ातील घोळ आणला उघडकीस

कोल्हापूर प्रतिनिधी

जिल्ह्य़ातील दूध संस्थांकडून मिल्कोटेस्टर आणि वजन काटय़ात फेरफार करुन प्रतिलिटर दूधामागे आठ ते नऊ रुपयांचा डल्ला मारला जात आहे. यामधून दूध उत्पादक शेतकऱयांची फसवणूक सुरु असून लाखो रुपयांची मलई दूध संस्थाचालकांच्या घशात निघली असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी केला. तसेच ही फसवणूक थांबण्यासाठी आता दूध उत्पादकांनीच मिल्कोटेस्टर आणि वजन काटय़ाची उलट तपासणी करण्याचे आवाहन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. दूध संस्थांकडून होणारी ही फसवणूक त्यांनी गेल्या चार दिवसांमध्ये प्रात्यक्षिकामधून उघड केली आहे.

पाटील म्हणाले, दूध संस्थांकडून मिल्कोटेस्टरमध्ये फेरफार केला जात आहे. यामुळे मूळ फॅट पेक्षा कमी फॅट मशिनवर दाखवले जाते. तसेच इलेक्ट्रॉनिक्स वजन काटय़ामध्ये ही फेरफार करुन दररोज हजारो लिटर दुधाचा घोटाळा सुरु आहे. मिल्कोटेस्टर मशिन हे शासनाच्या कोणत्याच विभागाच्या नियंत्रणात नाही. त्यामुळे मिल्कोटेस्टरची तपासणी करुन कारवाई करणार कोण असा प्रश्न दूध उत्पादकांसमोर आहे. त्यामुळे आता दूध उत्पादक शेतकऱ्यांनीच जागरुक होण्याची गरज आहे.

वेळोवेळी दूध संघांच्या पॅकींग दूधाची पिशवी घेवून या मशिनची उलट तपासणी दूध उत्पादकांनी करावी. पॅकींग पिशवीवरील फॅट व वजनाची नोंद ही बरोबर असते. पिशवीवरील फॅट व वजनाच्या नोंदीपेक्षा दूधा संस्थांच्या मशिवनवर हे प्रमाण कमी आढळल्यास मशिनमध्ये फेरफार केल्याचे स्पष्ट होईल. त्यामुळे पॅकींग दूधाची पिशवी घेवून दूध संस्थांच्या मशिनची तपासणी दूध उत्पादकांनी करावी, असे आवाहन पाटील यांनी केले.

प्रात्यक्षिकातून उघड केली फसवणूक
पाटील यांनी प्रात्यक्षिकासाठी गोकूळ दूध संघाची पॅकींग पिशवी घेतली. या पिशवीची फॅट आणि वजन काटय़ावर तपासणी केली. यामध्ये पॅकींग पिशवीवर 6.5 फॅटची नोंद होती. मात्र दूध संस्थेच्या फॅट मशिनवर तपासणी केली असता 6.3 इतके फॅट दाखविण्यात आले. त्यानुसार फॅटमध्ये प्रतिलिटर पॉईट दोनचा फरक दिसून आला. संस्थेच्या वजन काटय़ावर पॅकींग पिशवी मधील दूधाचे वजन केले असता ते 900 मिली इतके भरले. त्यानुसार प्रतिलिटर 100 मिलीचा फरक दिसून आला. तसेच एसएनएफ 7.8 आला. तो किमान 8.7 असणे अपेक्षित होते. मात्र यामध्येही एक युनिटचा फरक दिसून आला. त्यानुसार फॅटमध्ये प्रतिलिटर 1 रुपया, एसएनएफमध्ये 2.5 रुपये आणि वजनामध्ये सुमारे पाच ते सहा रुपये अशी प्रतिलिटरमागे दूध उत्पादक शेतकऱयाची आठ ते साडे नऊ रुपयांपर्यंत फसवणूक होत असल्याचे पाटील यांनी प्रात्यक्षिकामधून उघड केले.

तरुण भारतच्या वृत्तानंतर संभाजी ब्रिगेडची ‘पर्दाफाश मोहिम’

मिल्कोटेस्टर आणि वजन काटय़ातील घोटाळ्याबाबत तरुण भारतने आठ दिवसांपूर्वी वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन दुधसंस्थांकडे असणारा मिल्कोटेस्टरचा पासवर्ड रद्द करून नवीन पासवर्ड देण्यात आला. आणि हा पासवर्ड यापुढे केवळ गोकुळकडेच राहणार आहे. त्यानंतर संभाजी ब्रिगेडकडून पुन्हा दुध संस्थांचे मिल्कोटेस्टर आणि वजनकाट्य़ांची उलट तपासणी केली. यामध्ये फॅट व वजनामध्ये तफावत आढळून आली.


Related Stories

बेलवळे बुद्रुक येथे ५५ एकर ऊस जळून खाक; पाच लाखाचे नुकसान

Abhijeet Khandekar

नवरात्रोत्सवात राजाराम रोड बंद केल्याने व्यापारावर पाणी !

Archana Banage

बांधकाम साहित्य दरवाढीमुळे सदनिका किंमतीत वाढ

Abhijeet Khandekar

मोटरसायकल घसरून अपघात; महिला जागीच ठार

Archana Banage

पर्यटन विकासासाठी लोकसहभाग महत्वाचा

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात 4 दिवसांत सक्रीय रूग्णसंख्या दुप्पट

Archana Banage