तावडे हॉटेल येथील घटना : इनकमटॅक्स ऑफिसर असल्याची बतावणी करुन चौघांचे कृत्य
प्रतिनिधी/कोल्हापूर
इनकमटॅक्स ऑफिसर असल्याची बतावणी करुन चौघा भामटय़ांनी सांगलीच्या सोनाराची 80 लाखांची रोकड हातोहात लंपास केली. बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मुक्तसैनिक वसाहत येथील सिग्नलजवळ ही घटना घडली. याबाबतची फिर्यादी धनाजी आनंदा मगर (वय 32 रा. नागाव ता. वाळवा जि. सांगली) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली.
याबाबत अधीक माहिती अशी की, धनाजी मगर हे बुधवारी सांगलीहून कोल्हापूरला सोने खरेदी करण्यासाठी आले होते. गुजरी येथील व्यापाऱ्याकडून ते सोने खरेदी करणार होते. साधरणपणे 80 लाख रुपयांचे सोने दिवाळीसाठी ते खरेदी करणार होते. सांगलीहून निघताना 40 लाख रुपये सॅकमधून घेवून आले होते. तर त्यांनी 40 गांधीनगर येथील मित्र संतोष कुकरेजा यांच्याकडे ठेवली होती. गांधीनगर येथील खरेदी आटोपून रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ते गांधीनगरहून गुजरीकडे सोने खरेदीकरण्यासाठी निघाले होते. मुक्तसैनिक वसाहत येथील सिग्नल जवळ ते आले असता, दोन दुचाकीवरुन चौघेजण त्यांच्या जवळ आले. त्यांनी तु लई फास्ट आला आहेस. तुझ्याकडे किती पैसे आहेत ते आम्हाला दाखव आम्ही इनकमटॅक्स ऑफीसर आहोत अशी बतावणी केली. तसेच जबरदस्तीने धनाजी मगर यांना दुचाकीवर बसवून त्यांना शिरोली एमाआयडीसी परिसरात नेले. पैसे तपासण्याच्या बहाण्याने या चौघांनी मगर यांच्याकडील पैशाची बॅग स्वतकडे घेतली व मगर यांना सांगली फाटा येथे सोडून या चौघांनी पोबारा केला.