वाकरे / प्रतिनिधी
कोल्हापूर -गगनबावडा राज्यरस्त्यावरील बालिंगे पुलाखाली भोगावती नदीत उडी मारून एका तरुणाने आत्महत्या केली.दिलीप शिवाजी परीट- वय ३२(रा. पडळ, ता. पन्हाळा) असे या तरुणाचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळ आणि करवीर पोलिसातून मिळालेली माहिती अशी की मयत दिलीप हा गावातील एका ग्रंथालयात क्लार्क म्हणून नोकरीस होता. गेल्या काही दिवसांपासून त्याचे मानसिक संतुलन बिघडले होते. त्यामुळे यापूर्वी त्याने दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता.गेल्या २९ डिसेंबरला तो कोल्हापूरला जातो म्हणून घरातून बाहेर पडला होता,तो परत आला नाही.
गुरुवारी सकाळी बालिंगे पुलाखाली भोगावती नदीपात्रात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह तरंगत असल्याचे पोहण्यास गेलेल्या काही लोकांच्या निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती पाडळी खुर्दचे पोलीस पाटील सुरेश पाटील यांना दिली.यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी हा मृतदेह नदीतून बाहेर काढला.दुपारी करवीर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.त्यांना मृताच्या खिशात साधा मोबाईल सापडला. या मोबाईलमधील सिमकार्डची माहिती घेतली असता हे सिमकार्ड दिलीप परीट यांच्या नावावर असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी दिलीप यांच्या भावाशी संपर्क साधला.ते घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी हा मृतदेह भावाचा असल्याचे सांगितले. त्यानंतर पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. सायंकाळी त्याच्यावर गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.या आत्महत्येची करवीर पोलिसात नोंद झाली आहे.