कोल्हापूर- जम्मू काश्मीरमधील पुँछ जिल्ह्यातील १३ नोव्हेंबर २०२० रोजी पाकिस्तानी सैन्याशी झालेल्या हल्ल्यात कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील बहिरेवाडीमधील अवघ्या २० वर्षीय ऋषीकेश जोंधळे शहीद झाले होते. मात्र ज्यांनी देशासाठी बलिदान दिले त्या ऋषिकेशचा आई वडिलांना त्रास देण्याचं काम ग्रामसेवकाकडून सुरू असल्याचे समोर आले आहे.
शहीद ऋषीकेश यांच्या कुटुंबीयांनी ग्रामसेवक राजेंद्र उर्फ दत्तत्रय शंकरनाथ डवरी यांच्याकडून होत असलेल्या त्रासाची तक्रार दिली आहे. तसेच ग्रामसेवकाच्या छळामुळे पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. कोल्हापूर जिल्हा पोलिस प्रमुख, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील आणि जिल्हा परिषदेचे सीईओ संजयसिंह चव्हाण यांना पत्र लिहून तक्रार दिली आहे आहे.
शहीद ऋषिकेश जोंधळे यांचे वडील रामचंद्र जोंधळे सध्या बहिरेवाडी येथे राहतात, त्यांनी दिलेल्या पत्रात असे लिहिले आहे की, मी बहेरीवाडी येथे राहण्यास असून माझ्या घरासमोरील राजेंद्र उर्फ दत्तत्रय शंकरनाथ डवरी (मुम्मेवाडी ता. आजरा) येथे ग्रामसेवक आहेत. हे मला व माझ्या कुटुंबियांना नाहक त्रास देत आहेत. राज्यभरातून लोकप्रतिनिधींसह अनेकजण घरी भेट देत असल्याने डवरीला या गोष्टी खटकत आहेत. त्यामुळे तो वारंवार माझ्या कुटुंबाचा अपमान करीत आहे.
1 जून रोजी डवरीने माझ्याबरोबर नाहक वाद घातला. तुझ्या मुलग्याला देशासाठी कोणी मरायला सांगितले होते ? असे अपशब्द वापरुन त्याने माझा व देशासाठी लढणाऱ्या असंख्य जवानांचा अपमान केला आहे. ज्या तिरंग्यातून माझ्या मुलाचा देह बहिरेवाडी आणला गेला. तो तिरंगा ध्वज मी माझ्या अंगणात उभा केला होता. डवरीने तो ध्वजही मला बळजबरीने काढायला लावला.
कुटुंबीयांची बदनामी होईल असा बोर्ड लावला
माझ्या घराचे बांधकाम चालू असताना डवरी बांधकाम कामगारांनाही नाहक त्रास देत होता. त्याच्या घराच्या बांधकामाचे साहित्य त्याने माझ्या घरासमोर आणून टाकले होते. ते साहित्य काढून घेण्याची विनंती केली असता त्याने उलट आम्हालाच शिवीगाळ केली. आमच्या विरोधामध्ये खोटी तक्रार केली. त्यामुळे देशसेवेसाठी लढणाऱ्या माझ्या कुटुंबाची नाहक बदनामी झाली आहे.
माझा एकुलता एक मुलगा अगदी कोवळ्या वयात देशासाठी शहीद झाल्यानंतर माझ्या कुटुंबाचा आधार गेला आहे. अशावेळी डवरी मात्र माझ्या कुटुंबाचा जगण्याचाच अधिकार काढून घेत आहे. गेल्या आठवड्यात त्याने भरचौकात माझ्या कुटुंबीयांची बदनामी होईल असा बोर्ड लावला आहे. यामुळे आमचे मानसिक खच्चीकरण झाले आहे. रात्री उपरात्री तो शिवीगाळ, आंगावर धावून येणे असे प्रकार करत आहे. यामुळे माझे कुटूंब पूर्णपणे असुरक्षित बनले आहे.
एकीकडे ऋषिकेश जोंधळे शहीद झाल्यानंतर सरकार व समाजातून माझ्या कुटुंबियांला मोठा आधार दिला गेला. मात्र, डवरी आमच्या कुटुंबियांच्या जीवावर उठला आहे. त्यामुळे माझ्या पत्नीसह माझी मुलगीही भयभीत झाली आहे. डवरीपासून आमच्या जिवीताला धोका आहे. तो प्रशासकिय सेवेत असल्याने पदाचा वापर करुन आमच्यावर दबाव आणत आहे. त्यामुळे डवरीपासून आम्हाला संरक्षण मिळावे.

