खुपिरेच्या कोळी बांधवांच्या जाळ्यात ५ फूट उंचीचा कोयरा जातीचा दुर्मिळ मासा
वाकरे प्रतिनिधी
खुपिरे (ता. करवीर) येथील शशिकांत, नितीन व ओमकार गवळी या कोळी बांधवांना भोगावती नदीत तब्बल २७ किलो वजन आणि ५ फूट उंचीचा कोयरा जातीचा दुर्मिळ मासा सापडला. हा मासा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
खुपिरे येथील कोळी शशिकांत, नितीन व ओंकार गवळी नेहमी भोगावती नदीत मासेमारी करतात. त्यांनी सोमवारी पहाटे चार वाजता शिंदेवाडी परिसरात भोगावती नदीत गळ टाकले होते. सकाळी साडेनऊ वाजता गळाला मोठा मासा लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. शशिकांत,नितीन व ओंकार गवळी यांनी महत्प्रयासाने हा मासा नदीबाहेर काढला. शिंदेवाडी येथे भला मोठा मासा सापडल्याची बातमी गावात पसरताच हा मासा पाहण्यासाठी नागरिकानी गर्दी केली होती. दरम्यान कोळी बांधवांनी या माशांचे वजन केले असता ते तब्बल २७ किलो भरले, तर त्याची उंची सुमारे पावणे पाच ते पाच फूट इतकी भरली. अशा प्रकारचा मासा नदीतील गोड्या पाण्यात आढळून येतो. सुमारे ४० किलोपर्यंत या माशाचे वजन असते. अशा प्रकारच्या माशाची पैदास कमी असते, त्यामुळे तो दुर्मिळ असतो. या माशाचा जबडा मोठा होता आणि कल्ले तांबड्या लाल रंगाचे होते तर त्याला २ फुट लांब मिशा होत्या.
शशिकांत गवळी यांनी ५ वर्षांपूर्वी भोगावती नदीत २३ किलो वजनाचा कोयरा मासा सापडला होता असे सांगितले. त्यानंतर सोमवारी २७ केली वजनाचा मासा सापडल्याचे सांगितले. या दुर्मिळ माशाची पैदास वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे ते म्हणाले.