पुलाची शिरोली/प्रतिनिधी
शिरोली हौसिंग सोसायटी येथे गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. एका राञीत चार ठिकाणी घरफोड्या केल्या आहेत. तर हाताला काही लागले नसल्यामुळे चोरट्यांनी घरातील साहित्य विस्कटून टाकले.
याबाबत शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झालेली नाही. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, भिमराव लबडे यांच्या घरात दोघे भाडोत्री रहात आहेत. हे दोघेही शिरोली औद्योगिक वसाहतीत नोकरीला आहेत. यातील राजेंद्र पायगल हे कौटुंबिक कार्यक्रमासाठी मुळ अमरावती गावी संपूर्ण कुटुंबासह गेले आहेत. तर दुसरे अगतराव जावीर यांचे घरातील लोक गावी गेले आहेत. तर ते स्वता घराला कुलूप लावून कामावर गेले होते. या दोन्ही घरांचे अज्ञात चोरांनी दरवाजाचे कडे कोयंडे उचकटून घरात प्रवेश केला. दोन्ही घरात किंमती वस्तू न मिळाल्याने चोरट्यांनी कपाटातील साहित्य विस्कटून टाकले.
दोन्ही घटने बरोबरच कोरगावकर काॅलनी व सावंत कॉलनी येथेही चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला. या एका रात्रीत चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाल्याने ग्रामस्थांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शिरोली एमआयडीसी पोलिसांकडे राञीची उपनगरात गस्त सुरू करण्याची मागणी केली जात आहे.