पाणी विसर्जन केले पुर्णता बंद
धामोड/ वार्ताहर
केळोशी बुद्रुक ( ता. राधानगरी )येथील लोंढा नाला लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या गेटरुमला संतप्त प्रकल्पग्रस्तांनी टाळे ठोकले . शिवाय लपा तलावातून होणारा पाण्याचा विसर्गही बंद केला . गेल्या कित्येक वर्षापासून या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांची शासन स्तरावरून दखल न घेतल्याने संतप्त प्रकल्पग्रस्तांनी अशी भूमिका घेऊन शासनाचा निषेधही केला .
केळोशी बु॥ ( ता. राधानगरी ) येथील बैलगोंड ओढयावर २००६ साली ५६०६ .२२५घनमीटर क्षमतेचा हा प्रकल्प उभारला आहे . जवळपास ४५ शेतकऱ्यांचे ३३ हेक्टर क्षेत्र या प्रकल्पात बुडीत झाले आहे . साठवणीतील पाण्यामुळे केळोशीसह सात गावचे ४७० हेक्टर शेतीक्षेत्र ओलिताखाली येऊन परिसर हरितमय झाला आहे . तर पावसाळ्यातील उर्वरीत पाणी उजव्या कालव्याद्वारे थेट तुळशी जलाशयात जात असल्याने हा तलावही भरण्यास मदत होत आहे .
मात्र प्रकल्पात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांना अद्यापही न्याय मिळालेला नाही . संकलन यादी पूर्ण करणे , मुलकीपड जमिनी उपलब्ध करुन ताब्यात देणे , संपादीत जमिनीचे भूभाडे मिळणे , सुलभतेने पाणी परवाने मिळणे आदी मागण्या संबंधित खात्याकडे गेली सोळा वर्ष वारंवार पाठपुरावा करून देखील शासनस्तरावर दाद घेतलेली नाही . त्यामुळे शासनाच्या विविध विभागांना याबाबतचे लेखी निवेदन देऊन संतप्त प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी हि भूमिका घेतली आहे.
यावेळी ज्येष्ठ नागरिक गणपती पाटील, संभाजी पाटील,मारुती चौगले, कृष्णात पाटील, शंकर चौगले, श्रीपती पाटील, विष्णू पाटील, दीपक पाटील, चंद्रकांत पाटील ,ज्योतीराम चौगले ,राजू चौगले, अजित पाटील, सागर पाटील, मोहन पाटील , मारुती पाटील, सदाशिव पाटील,एकनाथ पाटील ,मारुती कदम ,कोंडीबा पाटील ,उत्तम चौगले ,प्रदीप पाटील, नितीन पाटील, दिनानाथ पाटील, तानाजी कांबळे, सुभाष कांबळे, आदी प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.