राजू घाटगे / भोगावती
भाटणवाडी ता. करवीर येथील आकाश सखाराम यादव याने हेर्ले ता. हातकणंगले येथे साजणी गावच्या युवकांचे प्राण धाडसाने जिवावर उदार होऊन वाचविण्यात यश मिळविले. रविवारी ता २२ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना हेर्ले गावात घडली. यामुळे आकाश धावला म्हणूनच रविराज बचावला आहे.
हेर्ले गावात सद्या यात्रा चालू आहे. तेथील यात्रेला साजणी ता. हातकणंगले येथील रविराज संजय कांबळे हा युवक त्याचे नातेवाईक मामांकडे आला होता. तर आकाशसुद्धा आपल्या बहिणीकडे भाच्याच्या जाऊळ कार्यक्रमासाठी गेला होता. काल सकाळी जेवण करून रविराज गँलरीत उभा होता. त्याचवेळी वार्याच्या वेगाने विद्युत वाहिनी (थ्री फेज) चा त्याच्या हातास स्पर्श झाला. यामुळे विद्युत वाहिनी त्याच्या हातास चिकटून राहिल्याने तो जोर जोरात ओरडू लागला.
त्याचा आवाज ऐकून आकाशने प्रसंगावधानाने तिकडे धाव घेतली. दुसऱ्या मजल्यावर धावत जाऊन लाकडी फळीचा जोरात दणका रविराजच्या हातावर मारला. यामुळे विद्युत तारापासून त्याचा हात वेगळा झाला. परिणामी विजेचा संपर्क तुटल्याने रविराजचा जीव वाचला. या धाडसाबद्दल आकाशचे हेर्लेचे दोन्ही नातेवाईक व उपस्थितांनी आभार मानले. याबद्दल आकाशचे सर्वत्र कौतुक होत आहे.