तपासासाठी दोन पथके रवाना
जत प्रतिनिधी
जत तालुक्यातील खोजनवाडी येथे शनिवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी करून सोन्याचे दागिने, व रोख रकमेसह साडेपाच लाखाचा ऐवज लंपास केला आहे . याबाबत जत पोलीसात चिदानंद सिदाप्पा संती यांनी फिर्याद दिली आहे. ही घरफोडी शनिवारी रात्री ११ वाजलेपासून रविवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली असावी, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, घटनास्थळी जत उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले यांनी भेट दिली आहे. तपासासाठी सांगलीहून श्वानपथकास पाचारण करण्यात आले होते. श्वानपथक जिल्हा परिषद शाळेच्या दिशेने घुटमळले. तसेच ठसेतज्ञ यांनीदेखील संभव्य ठसे घेतले आहेत. चोरट्यांच्या शोधासाठी दोन पथके रवाना झाली आहेत.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, खोजनवाडी येथे चिदानंद संती हे गावात राहत आहेत. ते शनिवारी रात्री जेवण करून अकरा वाजण्याच्या सुमारास सर्वजण झोपी गेले. त्यांच्या घरास दोन खोल्या आहेत. त्यातील एका खोलीत सर्वजण झोपले होते. दरम्यान चिदानंद संती शेतातील कामासाठी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास उठले होते. यावेळी त्यांच्या निदर्शनास स्वयंपाक खोलीचा दरवाजा कटावणीने तोडलेला दिसला. तसेच स्वयंपाक खोलीतील कपाटातील सर्व साहित्य विस्कटलेले दिसले.
चोरांनी कपाटाचे लॉक तोडून खोलीत प्रवेश करून कपाटातील साडेतीन तोळ्याचे मंगळसूत्र, चार तोळ्याचे गंठण, पाच ग्रॅम ची अंगठी, एक तोळ्याचे नेकलेस, दोन तोळ्याचे कर्णफुले, एक तोळ्याचे 20 सोन्याचे मणी, व दोन लाख दहा हजार रुपये रोख रक्कम अशी एकूण साडेपाच लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे.
या चोरीची माहिती संती यांनी पोलिसात दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तपासासाठी सांगलीहून श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. तपासासाठी आलेले श्वान जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दिशेने घुटमळले. तसेच ठसे तज्ञाने स्वयंपाक खोलीतील व अंगणातील संभाव्य ठसे नमुना तपासणीसाठी घेतले आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले यांनी घटनास्थळी भेट देत तपास अधिकारी व संबंधितांना कसून तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. चोरट्यांच्या शोधासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक व इतर एक पथक असे दोन पथके तपासासाठी रवाना झाले आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जगताप करीत आहेत.