Tarun Bharat

Kolhapur; गोकुळ’च्या आगामी निवडणुकीची ‘बेगमी’

सत्ताधाऱ्यांकडून 477 नवीन प्राथमिक दुध संस्थाची भर; कागल तालुक्यात सर्वाधिक 101 दुध संस्था वाढल्या; करवीरमध्ये 64 नवीन दुध संस्था; आगामी निवडणूक मतदानासाठी पात्र ठरणार संस्था

Advertisements

कृष्णात चौगले कोल्हापूर

गोकुळ दुध संघाची आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जिह्यात 477 नवीन प्राथमिक दुध संस्थांची भर पडली आहे. संस्थांची संख्या जरी वाढली असली तरी दुध संकलन पुर्वीपेक्षा घटल्यामुळे ठरावांची बेगमी आणि सेफ राजकारणासाठीच सत्ताधाऱ्यांनी नवीन प्राथमिक दुध संस्था काढण्याचा सपाटा लावल्याचे सिद्ध होते. जुन्या संस्थांमधीलच काही दुध उत्पादक नवीन दुध संस्थेत गेल्यामुळे या बोटाची थुंकी त्या बोटाला लावण्यासारखा प्रकार होत असून जुन्या दुध संस्था अडचणीत येणार आहेत.

पंधरा महिन्यांपूर्वी गोकुळ दुध संघाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. 2 मे 2021 रोजी मतदान तर 4 मे 21 रोजी मतमोजणी झाली. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसांपासून आगामी निवडणुकीची बेगमी करण्यासाठी सत्ताधाऱयांनी नवीन प्राथमिक दुध संस्था काढण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार 5 जून 2021 ते 12 जुलै 2022 अखेर जिह्यात 477 नवीन प्राथमिक दुध संस्थांची भर पडली आहे. यामध्ये कागल तालुक्यात सर्वाधिक 101 तर करवीरमध्ये 64 संस्था वाढल्या आहेत. या वाढीव दुध संस्था आगामी निवडणुकीमध्ये मतदानासाठी पात्र ठरणार आहेत.

गोकुळ दूध संघ म्हणजे जिह्यातील प्रमुख अर्थिक व राजकीय सत्ता केंद्र आहे. ज्यांच्याकडे गोकुळची सत्ता आहे, त्यांचीच जिह्याच्या राजकारणावर पकड असल्याचे आजतागायचे चित्र आहे. त्यामुळेच माजी आमदार महोदवराव महाडिक यांनी गेल्या अनेक वर्षांपासून जिह्यावर राज्य केले. महाडिक गटाचे हे शक्तीस्थान हस्तगत करण्यासाठी आमदार सतेज पाटील यांनी गेल्या सहा वर्षांपूर्वीच चंग बांधला होता. आणि त्यानुसार त्यांना यश देखील मिळाले. मल्टिस्टेट विरोधातील लढाईत आमदार पाटील यांच्यासोबत आमदार हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, के.पी.पाटील, ए.वाय.पाटील आदी महाडिक विरोधी यंत्रणा एकवटली. गोकुळ बचाव समितीच्या माध्यमातून तात्कालिन सत्ताधाऱयांच्या विविध निर्णयांविरोधात आवाज उठवला. प्रत्यक्ष निवडणुकीपर्यंत हा लढा जिवंत राहिल्यामुळे गतवर्षी झालेल्या निवडणुकीत विरोधी म्हणजेच सध्याच्या सत्ताधारी आघाडीला त्याचा मोठा फायदा झाला.

1 हजारांहून अधिक होणार नवीन दुध संस्था
गतनिवडणुकीत निर्विवाद यश मिळाल्यानंतर दुसऱया दिवसापासूनच सत्ताधारी संचालक आणि नेत्यांनी आगामी निवडणुकीचे नियोजन सुरु केले आहे. पहिल्या तीन वर्षात ज्या नवीन संस्था होणार आहेत, त्यांना पुढील निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार मिळणार आहे. त्यामुळे सत्ताधाऱयांकडून या कालावधीत सुमारे 1 हजार नवीन संस्था वाढवल्या जाणार असल्याचे समजते. त्यापैकी निवडणुकीनंतर अवघ्या 14 महिन्यातच जिह्यात 477 नवीन प्राथमिक दुध संस्था झाल्या आहेत. तर पुढील वर्षभरात हजाराचा टप्पा गाठला जाणार आहे. गतनिवडणुकीत सभासद संख्या 3 हजार 764 इतकी होती. वाढीव सभासद संख्येमुळे पुढील निवडणुकीपर्यंत ही संख्या सुमारे 5 हजारांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. आता राज्यातील सत्तांतराचे गोकुळमध्ये काय पडसाद उमटतात ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. राजकारणात कधीही काहीही होऊ शकते. त्यामुळे विद्यमान सत्ताधारी आगामी निवडणुकीत एकत्र राहतात की परस्पर विरोधात जातात याच्यावर नवीन दुध संस्थांचा फायदा, तोटा नेमका कोणाला होणार ? याचे भवितव्य ठरणार आहे.

संस्था वाढल्या, पण संकलन ‘जैसे थे’
जिह्यात दुध संस्थांची संख्या वाढली असली तरी त्या तुलनेत दुध संकलनात मात्र वाढ झालेली नाही. 31 मे 2021 रोजी म्हैस दुध 6.82 लाख लिटर होते. तर गाय दुध 6.28 लाख असे एकूण सरासरी 13.11 लाख लिटर दुध होते. 31 मे 2022 मध्ये दुध संकलनात गतवर्षाच्या तुलनेत 20 हजार लिटरची घट झाली. यामध्ये म्हैस दुध 6.63 लाख, गाय दुध 6.27 लाख असे एकूण 12.91 लाख लिटर सरासरी दुध संकलन होते. 30 जुलै 2022 चे संकलन पाहता म्हैस दुध 5.66 लाख तर गाय दुध 7.78 लाख असे एकूण 13.44 लाख लिटर दुध संकलन होते. दुदा संकलनाची आकडेवारी पाहता गोकुळ दुध संघाला अपेक्षित असणारी म्हैस दुध संकलनातील वाढ झालेलीच नाही. याउलट 31 मे 21 आणि 30 जुलै 22 ची संकलनाची आकडेवारी पाहता 1 लाख 16 हजार लिटर संकलनात घट झाली आहे. बाजारपेठेत गोकुळच्या म्हैस दुधाला जास्त मागणी असली तरी त्या तुलनेत उत्पादनामध्ये वाढ करण्यामध्ये सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. नवीन संस्था वाढल्यामुळे वाहतूक खर्च वाढला आहे. पण दुध संकलन मात्र कमी असल्याचे चित्र आहे.

जुने दुध संस्था चालक नाराज
नवीन दुध संस्था काढल्या असल्या तरी दुध उत्पादक मात्र वाढलेले नाहीत. गोकुळच्या जुन्या संस्थांमधीलच काही दुध उत्पादक नवीन संस्थेत गेले आहेत. यामध्ये काही उत्पादकांनी जुन्या संस्थातील उचलेली आगाऊ रक्कम आणि पशुखाद्याचे पैसे दिले नसल्यामुळे जुन्या संस्थांही अर्थैक अडचणीत आल्या आहेत. काही नाराज संस्था चालकांनी दुसऱया दुध संघाचा पर्याय शोधला आहे. त्यामुळे नव्या दुध संस्थांना परवानगी देताना त्यांची पात्रता पाहण्याची गरज आहे. सद्यस्थितीत बहुतांशी नवीन दुध संस्थांचे संकलन पाहता प्रतिदिन केवळ 20 ते 50 लिटरचे संकलन आहे.

तालुका निहाय नवीन दुध संस्था
शाहूवाडी 47, पन्हाळा 36, करवीर 64, शिरोळ 30, आजरा 15, गगनबावडा 12, भुदरगड 65, राधानगरी 50, कागल 101, हातकणंगले 9, चंदगड 9, गडहेंग्लज 39 अशा एकूण 477 नवीन दुध संस्था सुरु झाल्या आहेत.

Related Stories

कोल्हापूर जिल्ह्यात 1 नोव्हेंबरपासून नवमतदार नोंदणी

Archana Banage

शिंदेचे समर्थक कोल्हापूरचे शिवसेनेचे ‘ते पाच’ माजी आमदार गोव्यात

Abhijeet Khandekar

सावर्डे येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून प्रशासनाचे नियम धाब्यावर

Archana Banage

अविवाहित शेतकरी तरूणांना 10 लाख सानग्रह अनुदान द्या

Abhijeet Khandekar

सावे येथील अशोकराव माने इन्स्टिटयूट चे ऑनलाईन क्लासेस

Archana Banage

पाटबंधारे विभागाने तीन वर्षांचा आराखडा तयार करावा – पालकमंत्री

Archana Banage
error: Content is protected !!