लाचलुचपत विभागाची कारवाई
कोल्हापूर प्रतिनिधी
बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागातील लिपीकासह त्याच्या पत्नीवर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतिश गणपतराव सुर्यवंशी (रा. दिंडेनगर हौसिंग सोसायटी, पाचगाव) आणि त्यांची पत्नी अर्चना सुर्यंवंशी अशी त्यांची नावे आहेत. उत्पन्नापेक्षा 19 लाख 78 हजार 661 रुपयांची अपसंपदा जमा केल्याचे चौकशी अंती समोर आले असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक आदीनाथ बुधवंत यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी, जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागात सतिश सुर्यवंशी हे लिपिक म्हणून काम करतात. त्यांच्या मालमत्तेची उघड चौकशी करावी यासाठी तक्रार अर्ज पोलिस उपायुक्त लाच लुचपत प्रतिबंक विभाग पुणे यांच्याकडे प्राप्त झाला होता. यानुसार पुणे विभागाने कोल्हापूर विभागास आदेश प्राप्त दिले होते. यानंतर कोल्हापूर विभागातील पोलीस निरीक्षक नितीन कुंभार यांनी सुर्यवंशी यांच्या मालमत्तेची उघड चौकशी केली. त्यामध्ये ज्ञात उत्पन्नाचे स्त्रोतापेक्षा एकूण 19 लाख 78 हजार 661 रुपयांची असंपदा (बेहिशेबी मालमत्ता) असून त्याचे प्रमाण 17.68 टक्के असल्याची माहिती पुढे आली. यासंबधीची सर्व चौकशी पूर्ण करून संशयित सुर्यवंशी व त्यांची पत्नीवर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 कलम 13 (1)(ई) सह 13(2) सह कलम 109 प्रमाणे सरकारतर्फे लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान सुर्यवंशी यांच्या पाचगाव येथील घराची व इतर संपादित मालमत्तेची झडती प्रक्रिया सुरू असल्याचे उपअधीक्षक बुधवंत यांनी सांगितले. याबाबत अधिक तपास ते सुरु आहे.