Tarun Bharat

नियतीने हिरावला घरचा कर्ता पुरुष…

हुंदळेवाडीतील तरुणाच्या निधनाने गावावर शोककळा : पाच महिन्यापासूनची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

कुदनूर/विनायक पाटील

शेतकरी कुटुंबात जन्मलेला अन् प्रत्येकवेळी काम करण्याच्या मिळालेल्या नवनवीन संधी अखेर नियतीपुढे कुचकामी ठरल्याची हृदयद्रावक घटना हुंदळेवाडी (ता. चंदगड) येथे शनिवारी सायंकाळी घडली. आणि घरचा कर्ता सवरता पुरुष नियतीने हिरावला. संग्राम कल्म॓श्वर पाटील (वय २८) हा दिलखुलास, हसरा, प्रेमळ, मनमिळावू, दिलदार आणि राजबिंडा तरुण पायातील सुक्ष्म शिरेमध्ये गाठ निर्माण झाल्याने पाच महिने मृत्यूशी झुंज सुरू असतानाच शनिवारी काळाच्या पडद्याआड गेला अन् गावावर शोककळा पसरली.

हुंदळेवाडी गावाकडे पाहायला गेले तर कमी लोकसंख्येचं आणि सुशिक्षित लोकांचं गाव. या गावात शेतकरी कुटुंबामध्ये संग्रामचा १९९४ साली जन्म झाला. गावात प्राथमिक शिक्षण घेऊन माध्यमिक शिक्षणासाठी किणीच्या जयप्रकाश विद्यालयात चांगल्या गुणांनी तो उर्तीण झाला. त्यानंतर गडहिंग्लजच्या जागृती ज्युनिअर कॉलेजमधून बारावी विज्ञान शाखेतून पूर्ण केले. याशिवाय बी. कॉम आणि एम. कॉमची पदवीही मिळविली. शिक्षण घेत असतानाच त्याला शेतीची खूप आवड होती. आवडीपोटी तो आपल्या वडिलांना शेतीच्या कामात नेहमी मदत करायचा. बैलजोडी बरोबरच आधुनिक यंत्रांचा वापर करून शेतीतून अधिकाधिक उत्पन्न मिळविले जाऊ शकते हा प्रयत्नही त्याने यशस्वी करून दाखविला होता. मात्र, वडिलांच्या शब्दाबाहेर न जाणारा संग्राम त्यांच्या शब्दाखातर दोडामार्ग येथील केसरकर महाविद्यालयात लिपिक पदावर २-१४ साली रुजू होऊन शेतीपासून लांब गेला. मिळालेल्या संधीचे सोनं करणारा संग्राम कुटुंबाला नोकरीतून हातभार लावत होता. सर्वकाही सुरळीत सुरू असतानाच २०१६ साली संग्रामच्या वडिलांना बैलाने जबर दुखापत केल्याने त्यांचे दुःखद निधन झाले.

बावीसाव्या वर्षी कुटुंबाची जबाबदारी संग्रामवर
वडिलांचे अपघाती निधन झाले अन् बावीसाव्या वर्षी संग्रामवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पडली. आई, दोन लहान बहिणी यांच्यासह घर-शेती सांभाळून गावापासून लांब नोकरी करणे त्याला कठीण होत होते. त्यामुळे २०१९ साली दोडामार्ग येथील लिपिक पदाचा राजीनामा देऊन आपण शिकलेल्या गावापासून जवळ असलेल्या जयप्रकाश विद्यालयात रुजू झाला. नोकरी सांभाळत अथक परिश्रम घेऊन लहान दोन्ही बहिणींना उच्च शिक्षित केले. हे सर्व होत असताना दोन-तीन वर्षापासून त्याला सतत पाय दुखण्याचा त्रास होऊ लागला. या दुखण्यावर उपचार करताना निदान झाले की, पायातील सुक्ष्म नसामध्ये सुक्ष्म गाठ निर्माण झाली आहे. यावर तो चार-पाच महिन्यापासून दवाखान्यात उपचार घेत होता. मात्र, त्याच्या आकस्मिक निधनाचे वृत्त कळताच नियतीचे मन कसे ओळखायचे आणि नशीब तरी कशाला म्हणायचे ही चर्चा अनेकजण करू लागले.

महिन्यानंतर नोकरीत होणार होता कायम…
किणी येथील जयप्रकाश विद्यालयात २०१९ रोजी सेवेत रुजू झाल्यानंतर १४ जून २०२२ रोजी संग्राम सेवकपदाचा कार्यकाल पूर्ण करून कायम होणार होता. मात्र, कायम होण्याच्या महिन्याभरापूर्वीच काळाने घाला घातल्यामुळे वेळोवेळी मिळालेल्या संधीचे सोनं करणारा संग्राम दुर्दैवी ठरला. याशिवाय यापूर्वी तो ज्याठिकाणी काम करत होता त्या महाविद्यालयास गेल्या महिन्यात शासनाचे शंभर टक्के अनुदान प्राप्त झाले होते. त्यामुळे संग्रामच्या जाण्यामुळे गावासह त्यांच्या चाहत्यांना त्याची गैरहजेरी कायम भासणार आहे.

Advertisements

Related Stories

कोल्हापूर मनपा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभापतीपदी संजय पाटील

Abhijeet Shinde

‘कुंभी’ साखरचे साडे सहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

Abhijeet Shinde

वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात शाहू जयंती उत्साहात

Abhijeet Shinde

जलसमाधी घेणारा आंदोलकच गायब झाल्याने प्रशासनाची उडाली भंबेरी

Abhijeet Shinde

गडहिंग्लजच्या खेळाडूंना गोड बातमी; अत्याधुनिक क्रीडासंकुल होणार, हसन मुश्रीफ यांची माहिती

Abhijeet Shinde

त्या तक्रार अर्जाची जिल्हाधिकार्‍यांनी घेतली दखल

Abhijeet Shinde
error: Content is protected !!