कोवाड वार्ताहर
चंदगड तालुक्यातील कोवाड- किणी बस स्टॉपजवळ किणी हद्दीत मंगळवारी 14 रोजी प्रविण कृष्णा तरवाळ (वय 40, रा. किणी, ता. चंदगड) यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी चंदगड पोलीस ठाण्याने 24 तासांत संशयित चंद्रकांत रामू हदगल (वय 48, रा. मुळ नागरदळे, ता. चंदगड) यास ताब्यात घेतले. त्याच्यावर खुनाचा गुन्हा नोंद केला आहे.
याबाबत चंदगड पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, मंगळवारी, 14 रोजी सकाळी सातच्या सुमारास मयत प्रविण तरवाळ हा कोवाड- किणी रोडवर अनिरुध्द ऍटो टु व्हिलर गॅरेजसमोर सकाळी बेशुध्दावस्थेत पडला होता. त्याला नातेवाईकांनी उपचाराकरीता चंदगड येथील ग्रामीण रुग्णग्नालयात दाखल केले. पण त्याचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला. प्रवीणच्या वडिलांनी दिलेल्या वर्दीवरुन चंदगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली होती. पंचनामा करून चंदगड येथील ग्रामीण रुग्नग्णालयात शविच्छेदन केले होते.
प्रविण तरवाळ यांचा संशयास्पद मृत्यू प्रकरणी गडहिंग्लज उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाकरीता सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने चंदगड पोलीस ठाण्यामधील पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी पोलीस अधिकारी व स्टाफची वेगवेगळी पथके तयार करुन तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
प्रवीणचा मृतदेह मिळालेल्या परिसरात संशयित चंद्रकांत हदगल राहत होता. प्रवीण व संशयित चंद्रकांत एकमेकाच्या परीचयाचे होते. प्रवीण याच्या मित्राच्या पत्नीसोबत संशयित चंद्रकांतने विवाह केल्याचा रागातून प्रवीणने संशयित चंद्रकांत हदगलला शिवीगाळ करत धमकी दिली होती. त्याचा राग मनात धरुन संशयिताने गुन्हा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. संशयित हदगलकडे चौकशी करता त्यांने खुनाचा गुन्हा केल्याची कबुली दिली. चंदगड पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. संशयिताविरुध्द प्रवीणची पत्नी अंजली तरवाळ हिने दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंद केला आहे.
हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, पोलीस उपनिरीक्षक सत्पाल कांबळे, उपनिरीक्षक अंकुश कांरडे, उपनिरीक्षक हणमंत नाईक, उपनिरीक्षक अर्जुन जाधव, हेडकॉन्स्टेबल रावसाहेब कसेकर, संभाजी कोगेकर, पोलीस नाईक रामदास किल्लेदार, सुरेश भदरगे, संदीप कांबळे, सुर्यकांत सुतार, युवराज पाटील, अमोल देवकुळे, खुशाल शिंदे, दत्तात्रय पाटील, अमर सायेकर, मानगावे आदींनी परिश्रम घेतले.