गुह्यांमध्ये मदत करण्यासाठी 20 हजार स्वीकारताना पकडले
चंदगड/प्रतिनिधी
तक्रारदार व त्यांच्या वडिलांविरुद्ध दाखल असलेल्या गुह्यांमध्ये मदत करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून वीस हजारांची लाच स्वीकारताना चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमित भागवत पांडे (वय. 34) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. ही कारवाई पोलीस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी दुपारी करण्यात आली.
चंदगड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या पाटणे फाटा येथील पोलीस ठाण्यात दोनच महिन्यापूर्वी पोलीस उपनिरीक्षक म्हणून अमित पांडे यांनी पदभार स्वीकारला होता. अमित पांडे हे मूळचे खोतवाडी ता. हातकणंगले येथील असून सध्या ते पाटणे फाटा येथे राहत होते. पोलीस ठाण्यात एका प्रकरणात तक्रारदार व त्यांच्या वडिलांविरुद्ध दाखल झालेल्या गुह्यात मदत करण्यासाठी अमित पांडे यांनी 50 हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ती रक्कम चाळीस हजार रुपये निश्चित झाली होती. त्यातील पहिला 20 हजारांचा हप्ता देताना माणगाव फाटय़ावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱयांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले. पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, उपअधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, सुनील घोसाळकर, नवनाथ कदम, संदिप पडवळ, मयुर देसाई, सुरज अपराध यांनी ही कारवाई केली.