संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीतर्फे उदंड उत्साहत शिवजयंती साजरी
कोल्हापूर प्रतिनिधी
सुराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारून लोककल्यानासाठी झटणारे नवयुग प्रवतर्क, कुशल संघटक, प्रजाहितदक्ष छत्रपती शिवाजी महाराज सामर्थ्यशाली राजे होते, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले. संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीचे वतीने निर्माण चौक येथे रविवारी सायंकाळी शिवजयंती निमित्त आयोजित भव्य मिरवणुकीच्या शुभरंभाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहू छत्रपती होते. आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, उत्सव समितीचे संस्थापक माजी नगरसेवक शारंगधर देशमुख यांच्या उपस्थितीत मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, माजी नगरसेवक राजेश लाटकर, सचिन चव्हाण, दीपा मगदूम, रिना कांबळे, विक्रम जरग, उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करत ढोलताशे स्वराज्यरथ, शोभायात्रा, शिवकालीन युद्धकला प्रात्यक्षिके पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुकीची सुरवात झाली. हत्तीवर बसलेला छत्रपती शाहू महाराज रूपातील बालचमू मिरवणुकीचे आकर्षण ठरले.
सोमवारी क्रशर चौकात शिवाजी महाराजांच्या मूर्तीपूजा, पाळणा, भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण प्रमिला देशमुख उत्सव समितीचे संस्थापक माजी नगरसेवक शारंगधर देशमुख अध्यक्ष अभिजित खतकर, इजाज नागरकट्टी, आनंदा पाटणकर यांच्या उपस्थित करण्यात आले. सायंकाळी महिला शाहीर राधिका कालेकर यांचा पोवाडय़ाचा कार्यक्रम झाला. यावेळी विविध क्षेत्रातील गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अवघे उपनगर शिवमय
उपनगरांतील सर्वच मुख्य रस्त्यांवर लावण्यात आले भगवे ध्वज, भगवे फेटे परिधान केलेल्या महिला युवती शाळकरी विद्यार्थी विविध युवा मंडळांचे कार्यकर्ते जय शिवाजी जय भवानीचा नामघोष यामुळे अवघे उपनगर शिवमय बनले होते.
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन
शिवजयंतीनिमित्त आयोजित या मिरवणुकीत मुस्लिम युवक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. आमदार ऋतुराज पाटील यांनी त्यांना रमजान ईदच्या शुभेच्छा देत फराळ भरविला. सर्वांनी शिवरायांचा जयजयकार करत ऐक्याचे दर्शन घडविले.