सत्ताधारी, विरोधी संचालकांमध्ये खडाजंगी; अहवाल सालातील नफा बोगस असल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा; नफा विभागणी बेकायदेशीर असल्याचा विरोधकांचा आरोप; विरोधकांच्या 13 वर्षातील कारभाराचा चौकशी करण्याचा ठराव
कोल्हापूर प्रतिनिधी
माजी संचालक मंडळाच्या सत्ता कालावधीत दाखवलेला निव्वळ नफा, विद्यमान संचालकांनी या नफ्याची अन्य तरतुदींमध्ये केलेली विभागणी, माजी संचालकांनी उधळपट्टी केल्याचा आरोप, नफा दाखवल्यामुळे बँकेला इन्कम टॅक्सचा बसलेला भुर्दंड, नफ्यातील रकमेची बुडीत कर्ज निधीसाठी केलेली तरतूद, आणि सभासदांच्या लाभांशच्या मुद्यावरून रविवारी आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलमध्ये दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा चांगलीच गाजली. प्रास्ताविकापासूनच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरु झालेल्या खडाजंगीमुळे संपूर्ण सभा गोंधळात पार पडली. तर सत्ताधाऱ्यांच्या आरोपाला उत्तर देणारे आणि प्रतिप्रश्न उपस्थित करणाऱया काही माजी संचालकांना धक्काबुक्की झाल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
अधिक वाचा- शिक्षक बँक सभेत सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांची कोंडी
अध्यक्ष अर्जुन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि सर्व संचालकांच्या उपस्थितीत शिक्षक बँकेची सर्वसाधारण सभ पार पडली. गेल्या 13 वर्षातील बँकेच्या कारभारातील त्रुटीवरुन सभेच्या सुरुवातीपासूनच सत्ताधाऱयांनी उपस्थित विरोधी संचालकांना धारेवर धरले. अहवाल सालात 2 कोटी 38 लाख नफा झाला असून सत्ताधाऱयांनी सभासदांना 7 टक्के लाभांशापासून वंचित का ठेवले जात आहे ? असा सवाल माजी अध्यक्ष बाजीराव कांबळे, माजी संचालक संभाजी बापट, प्रसाद पाटील, प्रशांत पोतदार, लक्ष्मी पाटील यांनी उपस्थित केला. यावेळी अहवाल सालात अन्य बाबींसाठी तरतूद न करता दाखवलेला नफाच बोगस असून तो फूगवून दाखवला आहे. त्यामुळे बँकेला विनाकारण 46 लाख 50 हजार रूपयांचा इन्कम टॅक्स भरावा लागला असल्याचे प्रत्युत्तर अध्यक्ष अर्जून पाटील, कार्यकारी संचालक संजय मगदूम आणि कोअर कमिटीचे सदस्य संदीप मगदूम यांनी दिले. या आरोप प्रत्यारोपांच्या फैरीमध्ये विरोधी संचालक मंडळाच्या कालावधीतील 31 मार्च 2022 चा जुना ताळेबंद रद्द करून नफा विभागणीच्या नवीन ताळेबंदास मंजूरी देण्यात आली. गेल्या अनेक वर्षात प्रथमच ही सभा पोलीस बंदोबस्ताशिवाय पार पडली.
माजी संचालकांचा सभात्याग
दुपारी 1 वाजता सुरु झालेली सभा सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालली. सभेच्या शेवटी विरोधी संचालकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना सत्ताधाऱ्यांनी समर्पक उत्तर दिले नसल्यामुळे त्यांनी सभात्याग केला.
माजी संचालक मंडळाच्या कारभारच्या चौकशीचा ठराव
माजी संचालक मंडळाच्या कालावधीत कोणकोणते निर्णय घेतले, कोणत्या अर्थिक तरतुदी केल्या ? त्याचा बँकेला कोणता फायदा-तोटा झाला ? उधळपट्टी कशी केली ? आदी सर्व बाबींची चौकशी करण्याचा ठराव सभेमध्ये करण्यात आला.