रस्ताही नसलेल्या शेतातील गोठ्यात राहून १२ वी सायन्सला ९२.१७ टक्के गुण : सानिकाला शिक्षण व स्वयंसेवी संस्थांनी आर्थिक हातभार लावण्याची गरज
प्रा.एस.पी.चौगले/वाकरे
ना घराकडे जाण्यासाठी रस्ता…ना घरात वीज व टीव्ही… ना घरात पिण्याच्या पाण्याचा नळ…कोणत्याही भौतिक सुविधा नसलेल्या शेतातील गोठ्यात बिकट परिस्थितीत केवळ दिव्याच्या उजेडात अभ्यास करून श्रीराम ज्यूनियर कॉलेज, कुडित्रेच्या सानिका अशोक पाटील (रा. कोपार्डे, ता. करवीर) या विद्यार्थिनीने १२ वी सायन्स परीक्षेत ९२.१७ टक्के गुण मिळवून लखलखीत यश मिळवले आहे. या विद्यार्थिनीला इंजीनियरिंग पूर्ण करून स्पर्धा परीक्षेत करिअर करायचे आहे. मात्र बिकट आर्थिक परिस्थितीअभावी तिची अडचण होणार असल्याने या हुशार विद्यार्थिनीला शिक्षण संस्था आणि स्वयंसेवी संस्थांनी आर्थिक हातभार लावण्याची गरज आहे.
कोपार्डे येथील सांगरुळ फाटा,नंदीवाले वसाहतीपासून एक किलोमीटर अंतरावर अशोक जयराम पाटील हे शेतातील गोठयात वास्तव्यास आहेत.गावात घर नसल्याने ३० वर्षापूर्वी त्यांनी तुटपुंज्या वडिलोपार्जित शेतात हे घर बांधले असून चार जणांचे कुटुंब याठिकाणी राहत आहे.
आज या विद्यार्थिनीच्या घराला प्रत्यक्ष भेट दिली असता तिच्या घराकडे जाण्यासाठी उसातील पायवाटेचा रस्ता पकडावा लागला. या ठिकाणी त्यांचा जनावरांसाठी बांधलेला गोठा आहे. वडील तुटपुंज्या शेतीबरोबरच चार-पाच जनावरे पाळून दुग्ध व्यवसायावर कुटुंबियांचा चरितार्थ चालवत आहेत. अत्यंत हुशार असणाऱ्या सानिका या विद्यार्थिनीने सांगरूळ शिक्षण संस्थेच्या श्रीराम हायस्कुल, भागशाळा कोपार्डे येथे इयत्ता पाचवीला प्रवेश घेतला.
घर शेतात असल्याने पावसाळ्यात चिखल तुडवत तर उन्हाळ्यात उसातील पायवाटेने रस्ता काढत तिला शिक्षणासाठी यावे लागले.तिने १० वीपर्यंतचे शिक्षण भागशाळा कोपार्डे या ठिकाणी घेतले आणि ९४.४० टक्के गुण मिळवले. त्यानंतर श्रीराम ज्यूनियर कॉलेज,कुडित्रे येथे तिने १२ सायन्ससाठी प्रवेश घेतला. आर्थिक परिस्थिती बेताची असताना कॉलेजने तिला सर्वतोपरी सहकार्य केले.तिने दोन्ही ग्रुप घेऊन १२ वी सायन्सला ९२.१७ टक्के गुण मिळवले आहेत.
अभ्यासासाठी तिचा पहाटे एक वाजता दिनक्रम सुरू व्हायचा. घरात वीज नसल्याने आणि रॉकेल मिळत नसल्याने खाद्य तेलाची समई लावून या उजेडात ती अभ्यासाला बसायची. पहाटे ५ वाजेपर्यंत अभ्यास केल्यानंतर घरातील सर्व कामे आटोपून ती सकाळी ७ वाजता कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासाठी जायची. पुन्हा घरी आल्यानंतर ती अभ्यासात रममाण व्हायची. आई शेतात गेल्यानंतर तिला धुणीभांडी, स्वयंपाक, जनावरांंची देखभाल आणि पाणी भरण्याची कामे करावी लागायची. त्यातूनही वेळ काढून ती अभ्यास करायची. वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे तिला आपल्या परिस्थितीची जाणीव होती. त्यामुळे आपण कॉलेजला जाऊन मोठे यश मिळवायचे उद्दिष्ट तिने ठेवले होते. दहावीच्या गुणाची चांगली साथ असल्याने बारावीला चांगले गुण मिळण्याची तिला खात्री होती,त्यामुळेच १२ वी परीक्षेत लखलखीत यश मिळवले आहे.
सांगरूळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यशवंत खाडे उपाध्यक्ष के.ना.जाधव,सेक्रेटरी आमदार जयंत आसगावकर, प्राचार्य ए.के.भगाटे, उपप्राचार्य सी.एन. वाळके व सर्व प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली तिने दिव्याच्या उजेडात लखलखीत यश मिळवले आहे. तिला भविष्यात इंजिनीअरिंगचे शिक्षण घ्यायचे असून आता तिची आर्थिक परिस्थिती आड येण्याची शक्यता आहे. सानिकाचे हे यश सर्व सुविधा उपलब्ध असूनही केवळ परिस्थितीचा बाऊ करणाऱ्या विद्यार्थ्यांना यशाचा मार्ग दाखवणारे आहे.
मुलीच्या यशामुळे वडील भावुक-
सानिकाचे वडील अशोक पाटील यांनी भावनावश होऊन आपल्या मुलीने दिव्याच्या उजेडात हे यश मिळवून आपला पांग फेडल्याचे सांगितले.
अधिकारी होण्याचे स्वप्न-
सानिका पाटील हिने भविष्यात आपल्याला अभियंता होऊन स्पर्धा परीक्षेतून अधिकारी होण्याचे स्वप्न असल्याचे सांगितले.
सानिका पहाटे उठते, तिला सांगा-
आपली मुलगी रात्रभर विश्रांती न घेता पहाटे १ वाजता उठून अभ्यास करते,तिला जरा विश्रांती घ्यायला सांगा अशी तक्रार घेऊन आलेले हे पहिले पालक असल्याची प्रतिक्रिया तिच्या सर्व प्राध्यापकांनी नोंदवली.