एका महिला सावकारासह चौघांवर गुन्हा दाखल; लाखो रुपय उकळूनही घरी जावून जीवे मारण्याची धमकी
कोल्हापूर प्रतिनिधी
खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून महापालीकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्याने विष प्राशन करुन आत्महत्या केली. विनायक बाळासो सुर्वे (वय 53 रा. चैतन्य अपार्टमेंट, माने गल्ली, मंगळवार पेठ) असे मृताचे नांव आहे. याबाबतची फिर्याद सिद्धी विनायक सुर्वे (वय 39) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली. यानुसार उमेश जाधव (रा. निवृत्ती चौक), बंटी महाडिक (रा. रामानंदनगर), श्रीकांत शंकरराव माने (रा. मंगळवार पेठ), मिनल पटेल (रा. पाचगांव) यांच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विनायक सुर्वे हे महापालीकेच्या उद्यान विभागामध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत होते. त्यांच्या पत्नी सिद्धी खासगी नोकरी करत होत्या. 15 वर्षापूर्वी विनायक सुर्वे यांनी अर्धा शिवाजी पुतळा येथील खाजगी सावकार उमेश जाधव याच्याकडून 40 हजार रुपये घेतले होते. याची आजतागायत 7 ते 10 लाख रुपयांची परतफेड केली होती. मात्र तरीही उमेश जाधव हा वारंवार विनायक सुर्वे यांना मुद्दल परत देण्यासाठी त्रास देत होता. तसेच एक वर्षापूर्वी रामानंद नगर येथील बंटी महाडिक याच्याकडून 40 हजार रुपये 10 टक्के व्याजाने घेतले होते. यापैकी 35 हजार रुपये त्यांनी वेळोवेळी दिले होते. मात्र तरीही बंटी महाडिक याच्याकडून आणखी 2 लाख रुपयांसाठी तगादा लावला जात होता. यासाठी बंटी महाडिक कडून वेळोवेळी धमकी देवून घराला कुलूप लावण्याची धमकी दिली जात होती. हे पैसे भागवण्यासाठी सहा महिन्यापूर्वी मंगळवार पेठ येथील श्रीकांत माने याच्याकडून 80 हजार रुपयांची रक्कम महिना 10 टक्के व्याजाने घेतली होती. या बदल्यात श्रीकांत माने याने वाय.पी. पोवार नगरमधील 1 गुंठा प्लॉट जबरदस्तीने लिहून घेतला होता. मात्र या 80 हजारांपैकी केवळ 25 हजार रुपयेच माने याने दिले. तसेच आम्ही राहत असलेल्या घरमालकांना सुर्वेला घरातून बाहेर काढा असे सांगत होता. तसेच पाचगांव येथील मिनल पटेल यांच्याकडूनही 10 टक्के व्याजदराने 10 हजार रुपये घेतले होते. सावकारांकडून होणाऱ्या तगाद्याला घाबरुन केल्या काही महिन्यांपासून विनायक सुर्वे यांनी कामावर जाणे बंद केले होते. मात्र तरीही बंटी महाडिक, उमेश जाधव, श्रीकांत माने, मिनल पटेल यांनी वारंवार पैश्यासाठी तगादा लावला होता. यास कंटाळून विनायक सुर्वे यांनी राहत्या घरी रविवारी दुपारच्या सुमारास गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पत्नी सिद्धी यांनी विनायक यांना रोखले. मात्र काही वेळातच त्यांनी विषारी द्रव्य प्राशन केले. त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी दुपारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
सावकारांची दहशत
विनायक सुर्वे, श्रीकांत माने, बंटी महाडिक, उमेश जाधव, मिनल पटेल या चारही सावकारांच्या दहशतीखाली गेल्या महिन्याभरापासून होते. खासगी सावकार कामाच्या ठिकाणी धमकावत असल्यामुळे एक महिन्यापासून विनायक सुर्वेंनी कामावर जाणे बंद केले होते. यानंतर या चारही सावकारांनी घरी येवून सुर्वे व त्यांच्या कुटूंबियांना धमकावण्याचा प्रकार सुरुच ठेवला होता. यामुळे विनायक सुर्वे गेल्या महिन्याभरापासून तणावात होते.