शाहूवाडी/प्रतिनिधी
इतिहासाचा साक्षीदार असलेल्या किल्ले विशाळगड येथील अतिक्रमण हटवण्यास पुरातत्त्व विभागाकडून होत असलेल्या दिरंगाई बद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष युवराज काटकर यांच्या नेतृत्वाखाली पुरातत्त्व विभागाचं श्राद्ध घालण्यात आलं. तालुका अध्यक्ष धनाजी आगलावे यांनी मुंडन केलं. यावेळी पुरातत्त्व विभागाच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात हिंदुत्ववादी संघटना ही सहभागी झाल्या होत्या.
दरम्यान, किल्ले विशाळगड येथे होत असलेल्या अतिक्रमण बाबत वारंवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह हिंदुत्ववादी संघटनानी निवेदन देवून आंदोलन करून देखील पुरातत्व विभाग याकडे डोळे झाक करत आहे. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मलकापूर येथील विठ्ठल मंदिर नजीक कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर पुरातत्त्व विभागाचे श्राद्ध घालून तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसेचे शाहूवाडी तालुका अध्यक्ष धनाजी आगलावे यांनी मुंडन करून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. यावेळी बोलताना जिल्हा उपाध्यक्ष युवराज काटकर म्हणाले की, गेले अनेक वर्ष विशाळगड अतिक्रमण मुक्त होण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह हिंदुत्ववादी संघटना आक्रमक भूमिका घेत आहेत. शासन व पुरातत्त्व विभागाशी वारंवार याबाबत संपर्क साधून तसेच निवेदने देऊनही याकडे कानाडोळा केला जात आहे. यापुढे याकडे जर शासनाने व पुरातत्त्व विभागाने दुर्लक्ष केलं तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी युवराज काटकर यांनी दिला. यावेळी मनसेच्या वतीने पोलीस निरीक्षक विजय पाटील यांना यावेळी निवेदन देण्यात आले.
यावेळी रोहित जांभळे, हिंदुत्ववादी संघटनेचे महेश विभुते, रुपेश वारंगे, संभाजी आडकेकर, प्रदीप वीर, शिवाजी फिरके, बाबासाहेब भोपळे यांच्यासह मनसे पदाधिकार व हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.