लवकरच कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता; शासन पातळीवर हालचाली; थेट सरपंच निवडीमुळे बिनविरोधला अडथळा
कृष्णात चौगले / कोल्हापूर
मे ते डिसेंबर 2022 अखेर मुदत संपणाऱया जिह्यातील 479 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजणार आहे. 15 सप्टेबरनंतर ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असून आचारसंहिता लागू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शासन पातळीवर हालचाली सुरु आहेत. निवडणुकांचे वेध लागलेल्या गावांमध्ये आगोदरच राजकीय जोडण्यांना वेग आला आहे. सरपंचपदाची निवड थेट जनतेतून होत असल्यामुळे प्रत्येक गावात चुरस वाढणार आहे.
गावात जेवढे पक्ष, तेवढे गट असतात. काही गावात एकाच पक्षाचे दोन ते तीन गट आहेत. परिणामी ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये नेमकी कोणत्या गटाच्या बाजूने भूमिका घ्यायची याबाबत नेतेही संभ्रमात असतात. त्यामुळेच निवडणूक बिनविरोध करण्यासाठी नेत्यांचे प्रयत्न असतात. त्या पार्श्वभूमीवर आगामी काळात आपल्या गटाच्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र बोलावून त्यांचे मत आजमावले जाण्याची शक्यता आहे. एका गटाला सरपंच पद, दुसऱया गटाला उपसरपंचपद, तिसरा गट असेल तर त्याला सेवा संस्था किंवा दूध संस्थेचे अध्यक्षपद अशी विभागणी करून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी नेत्यांकडून हालचाली होण्याची शक्यता आहे. पण प्रत्येकाला आपल्याच गटाचा सरपंच हवा असल्यामुळे सरपंचपदासाठी अनेक गावांमध्ये निवडणूक लागण्याची शक्यता बळावली आहे.
नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
जिह्यातील सुमारे 50 टक्के गावांत निवडणुका होणार आहेत. ही निवडणूक म्हणजे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसह विधानसभेची रंगीत तालीम ठरणार आहे. परिणामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून एक-एक गाव ताब्यात घेण्यासाठी लोकप्रतिनिधींची ताकद पणाला लागणार आहे.
अनेक गावात बिनविरोधचे प्रयत्न सुरु
ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करावयाची झाल्यास कार्यक्षम, हुशार व गावासाठी योगदान देऊ देऊ शकणारा उमेदवार निवडणे आवश्यक आहे. सरपंच पद थेट जनतेतून निवडले जाणार असल्यामुळे या पदासाठी निवडणूक लढविण्यास अनेकजण इच्छूक आहेत. त्यामुळे गावातील सुकाणू समितीला सदस्य पदांची निवडणूक बिनविरोध करण्यास यश मिळण्याची शक्यता असली तरी सरपंचपदाची निवड बिनविरोध करण्यासाठी कस लागणार आहे.
जिह्यातील निवडणूक लागणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या
तालुका संख्या
करवीर 53
गगनबावडा 21
पन्हाळा 50
शाहूवाडी 49
कागल 27
राधानगरी 67
हातकणंगले 39
शिरोळ 17
आजरा 37
गडहिंग्लज 34
चंदगड 41
भुदरगड 45
एकूण 480