कर्जदारांची रक्कम परस्पर हडप
कोल्हापूर प्रतिनिधी
फायनान्स कंपनीची कर्जदारांकडून जमा झालेली 21 लाख 66 हजार रुपयांची रक्कम परस्पर हडप करुन अपहार केल्याप्रकरणी कंपनीच्या दोघा अधिकाऱयांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. अभिजित राजगोंडा पाटील (रा. सांगली) आणि ज्ञानेश्वर अंकूश सावंत (रा. निगडी खुर्द, सांगली) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद सचिन साबळे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली.
याबाबतची माहिती अशी, शाहूपुरीत असणारी एक प्रायव्हेट फायनान्स कंपनी गृहबांधणी, ट्रकटर, मोटारसायकलना कर्जपुरवठा करते. कंपनीमध्ये संशयित अभिजित हा एरिया कलेक्शन व्यवस्थापक आहे तर ज्ञानेश्वर कलेक्शन ऑफिसर म्हणून काम पाहतो. जून 2021 ते सप्टेंबर 2021 याकाळात या दोघांनी कंपनीच्या विविध कर्जदारांकडून कर्जाची 21 लाख 66 हजार 858 रूपये जमा करून घेतली. मात्र ही रक्कम त्यांनी कंपनीत जमा केली नाही. याबाबत कंपनीकडून संबंधीत कर्जदारांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी रक्कम भरल्याचे सांगितले. संबंधीत कर्जदारांनी ही रक्कम ज्ञानेश्वर व अभिजित यांच्याकडे दिल्याचे सांगितले. याबाबत कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱयांकडून विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर या दोघांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.