सर्प प्रेमींना दिली सापाबद्दलची शास्त्रीय माहिती…
कार्वे / वार्ताहर
ढोलगरवाडीचे सर्पमित्र कै. बाबुराव टक्केकर यांनी समाजातील सापांच्या बद्दलच्या अंधश्रद्धा व गैरसमज दूर करण्यासाठी आणि सापांची शास्त्रीय दृष्ट्या वैज्ञानिक माहिती व वैद्यकीय दृष्ट्या महत्त्व पटवून देण्यासाठी आणि शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना सापांची ओळख होण्यासाठी साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. त्याचे संवर्धन करणे हे समाजाचे कर्तव्य आहे. हे पटवून देण्यासाठी गेली 56 वर्षे नागपंचमीचा उत्सव मामासाहेब लाड विद्यालयच्या प्रांगणात साजरा केला जातो. प्रशासनाने नागपंचमी कार्यक्रमास बंदी घातल्याने यावर्षीही वनविभाग व पोलीस खाते यांच्या मार्गदर्शनाखाली ढोलगरवाडी येथे प्रबोधनात्मक नागपंचमी उत्सव साजरा करण्यात आला.
संस्थापक सर्पमित्र कै. बाबुराव टक्केकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी जीवंत सापाचे प्रदर्शन न करता सापांच्या माहितीचे फलक, चित्रकृती, विविध प्रकारचे मॉडेल्स या माध्यमातून सापांच्या बद्दलची माहिती सर्प प्रेमींना देण्यात आली. शाळेच्या विद्यार्थ्याकडून मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत सर्पप्रेमींना सापांच्या बद्दलची माहिती देण्यात आली. यावेळी संस्थेच्या संचालिका श्रीमती शांता बाबुराव टक्केकर यांचा सेवानिवृत्तीच्या निमित्ताने संस्था व सर्पमित्र यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कडलगे व ढोलगरवाडीचे पोलीस-पाटील राजेंद्र पाटील यांना आदर्श पोलीस पाटील पुरस्कार मिळाल्यामुळे सत्कार करण्यात आला.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा येथील हजारो पर्यटक सर्प प्रेमींनी नागपंचमी कार्यक्रमाला भेट दिली. यावेळी संपूर्ण दिवसभर पाटणे वन विभागाचे वनक्षेत्रपाल पी.ए. आवळे तसेच चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले गेले. यावेळी मुख्याध्यापक एन जी. यळळूरकर, संस्थेच्या संचालिका श्रीमती शांता टक्केकर , उपाध्यक्ष तानाजी वाघमारे, एन. एन. पाटील, सरपंच सरिता तुपारे, उपसरपंच व्हनापा तुपारे, धानबा कदम, विलास कांबळे, ब्रह्मलिंग विद्यालय हाजगोळीचे मुख्याध्यापक टी. बी. गिलबिले, संजय गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक महादेव भोगुलकर, सातेरी विद्यालय कोलीकचे मुख्याध्यापक गुलाब पाटील, गावडू पाटील, नरसू पाटील तसेच मामासाहेब लाड, विद्यालय व ज्युनि. कॉलेज शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.