Tarun Bharat

फुटबॉल संघ समर्थकांचा किळसवाणा प्रकार

सामन्यादरम्यान अश्लिल शिव्या, एकमेकांवर भिरकावल्या पाण्याच्या बाटल्या, मावा, पानाच्या पिचकाऱ्या मारलेल्याही सापडल्या बाटल्या

Advertisements

कोल्हापूर प्रतिनिधी

सतेज चषक फुटबॉल स्पर्धेअंतर्गंत दिलबहार तालीम मंडळ व शिवाजी तरुण मंडळ या संघांमध्ये अटीतटीने झालेल्या अंतिम सामन्यात संघ समर्थकांनी रविवारी अक्षरशः किळसवाणा प्रकार करुन कोल्हापूर फुटबॉल परंपरेला कलंकित केले. शिवाजी मंडळाने दिलबहारवर आणि दिलबहारने शिवाजी मंडळावर गोल केल्यानंतर समर्थकांनी अंगातील शर्ट काढून जल्लोषाच्या नावाखाली स्टेडीयममध्ये अक्षम्य हुल्लडबाजी केली. तसेच स्टेडियमच्या बैठक गॅलरीतून समर्थकांनी अश्लिल शिव्या देत एकमेकांवर पाण्याच्या बाटल्या भिरकावल्या. काही समर्थकांनी तर चक्क पान आणि माव्याच्या पिचकाऱ्या मारलेल्या पाण्याच्या बाटल्या खेळाडूंवरही भिरकावण्याचा संतापजनक प्रकार केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

केएम चषकाच्या अंतिम सामन्यात दिलबहारने शिवाजी मंडळाचा पराभूत केल्यानंतर शेकडो समर्थकांनी अंगातील शर्ट, टी-शर्ट काढून जल्लोष करत हुल्लडबाजी केली होती. ही हुल्लडबाजी मनात धरुन रविवारी सतेज चषकासाठी झालेल्या अंतिम सामन्यात शिवाजी मंडळाने दिलबहारचा 3-1 गोलने पराभव केल्यानंतर मंडळाच्या समर्थकांनीही अंगातील शर्ट, टी-शर्ट काढून जल्लोष करताना हुल्लडबाजी केली. तसे पहायला गेल्यास दोन्ही संघाच्या समर्थकांनी नाहक आणि फालतू ईर्ष्येपोटी सामन्याच्या 3 ते 4 मिनिटापासूनच हुल्लडबाजी करत मैदानात पाण्याच्या बाटल्या फेकायला सुरुवात केली. एक बाटली तर चक्क सामन्याचे मुख्यपंच सुनील पवार यांच्या हाताला लागली. त्यांनी आक्रमक पवित्रा घेत सामना 3 मिनिटे थांबवला. हा सामना थांबल्याचे पाहून दोन्ही संघ समर्थक गप्प बसतील, असे वाटले होते. पण त्यांनी जल्लोषाच्या नावाखाली हुल्लडबाजी सुरुच ठेवली. इतकेच नव्हे तर काही संघ समर्थकांनी चक्क पान, माव्याच्या पिचकाऱया मारलेल्या पाण्याच्या बाटल्या खेळाडूंवर भिरकावण्याचा किळसवाना प्रकार केला. सामन्याच्या उत्तरार्धात तर शिवाजी मंडळासह दिलबहारच्या समर्थकांनी स्टेडियमच्या हिरवळीवर शेकडो पाण्याच्या बाटल्या भिरकावून आपल्यातील अखिलाडूवृत्ती दाखवून दिली. समर्थक अशीच अखिलाडूवृत्ती दाखवू लागेल तर कोल्हापूरी फुटबॉल परंपरा बंद पडायला वेळ लागणार नाही, अशी प्रतिक्रीया फुटबॉल शौकिनांमधून व्यक्त होत आहे.

पोलीसांनी प्रेक्षक गॅलरीतून जाऊन दाखवला खाक्या…

फुटबॉल स्पर्धेवर आमच्या पेठेचे वर्चस्व की तुमच्या पेठे या नाहक ईर्ष्येचा गेल्या 10 वर्षांपासून कोल्हापूरी फुटबॉलच्या शालिन परंपरेला कलंक लागत आला आहे. रविवारी दिलबहार व शिवाजी मंडळ या संघांमधील अंतिम सामन्यात तर नाहक ईर्ष्येने टोक गाठले. आपल्या संघांच्या खेळाडूंना चिअर-अप करायचे सोडून समर्थकांनी एकमेकांना अश्लिल शिव्या दिल्या. शिव्या देताना त्यांनी स्टेडियममध्ये महिला, तरुणी, लहान मुलीसुद्धा आहेत, याचा साधा विचारही केला नाही. मात्र जेव्हा हुल्लडबाजी नियंत्रणाबाहेर जात आहे, असे लक्षात येताच पोलीसांनी थेट स्टेडियमच्या प्रेक्षक गॅलरी जाऊन पाण्याच्या बाटल्या फेकणाऱ्या आणि शिव्या देणाऱ्यांना खाक्या दाखवत चोपून काढले. पण तरीही हुल्लडबाजी थांबवली नाही, हे कोल्हापूरी फुटबॉलचे दुदैवच म्हणावे लागेल.

Related Stories

अमेरिकेत कोरोनाबळींची संख्या 50 हजारांपार

prashant_c

शाहूवाडी-शिराळा सीमा अजूनही लॉकडाऊन ; नागरिक संतप्त

Abhijeet Shinde

कोल्हापूर (पन्हाळा) : मंगळवारपेठ ग्रामस्थांच्या डोक्यावर दरडीचे संकट

Abhijeet Shinde

कोडोलीत तरूणाची आत्महत्या

Sumit Tambekar

राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत प्रेरणा कोळी प्रथम

Abhijeet Shinde

महिलांना १ रूपयात १० सॅनिटरी नॅपकिन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!