आग शॉर्टसर्किटने लागल्याची शक्यता; 25 दुचाकी जळाल्या
इस्लामपूर प्रतिनिधी
इस्लामपूर-पेठ रस्त्यावरील संभाजीनगर परिसरातील युनिक मोटर्स या जुन्या दुचाकी विक्रीच्या दुकान गाळ्यासह अन्य तीन दुकानांना आग लागून सुमारे 30 लाखांचे नुकसान झाले. यामध्ये सज्जाद हवलदार यांच्या दुकानातील 25 दुचाकी जळून खाक झाल्या. त्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. या आगीने त्यांना मानसिक धक्का बसला. त्यांना शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास या आगीचे तांडव सुरु झाले. नगरपालिकेच्या अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात आणली. ही आग शॉर्टसर्केटने लागल्याची चर्चा आहे.
कचरे गल्लीतील शिवाजी पाटील यांच्या मालकीचे 20 दुकान गाळे आहेत. ते त्यांनी भाडे तत्वावर दिले आहेत. या गाळ्यात वेगवेगळे व्यवसाय आहेत. मंगळवारी अचानक हवलदार यांच्या युनिक मोटर्स या दुकान गाळयाला आग लागून आगीचे व धुराचे लोट मोठय़ा प्रमाणात सुरु झाले. त्यामुळे एकच हाहाकार उडाला. आजू-बाजूच्या लोकांनी तात्काळ धाव घेतली. पण, हवलदार हे रमजान ईदमुळे ईदगाह मैदानावर नमाज पठणासाठी गेले होते. त्यामुळे त्यांना लवकर संपर्क होवू शकला नाही. लोकांनी पाठीमागील पत्रा तोडून पाहिले असता, आगीने रौद्ररुप धारण केले होते. यामध्ये दुचाकी जळाल्या होत्या.
दरम्यान, लोकांनी नगर पालिकेच्या अग्निशमन बंबास पाचारण केले. तो पर्यत आग पसरत गेली. यामध्ये लालासो येळापूरे(एम.आय.डी.सी) यांचे ज्यूस व बेकरी सेंटर, अक्षय नलवडे (मंत्री कॉलनी) यांचा चहाचा गाडा, मोहसिन मुल्ला यांच्या चहाच्या टपरीचा समावेश आहे. हवलदार यांचे सुमारे 12 लाखांचे, येळापूरे यांचे 10 लाखांचे, नलवडे व मुल्ला यांचे प्रत्येकी 4 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी लोकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, दुचाकीतील पेट्रोल, चहाच्या गाडयातील फ्रीज यांसह अन्य वस्तुंमुळे मदत कार्य अपुरे पडत होते.
इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण व अन्य कर्मचारी, नगर पालिकेचे मुख्याधिकारी वैभव साबळे यांच्यासह इतर अधिकाऱयांनी भेट देवून मदतकार्य गतिमान करण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीचे तांडव बराच वेळ सुरु होते. त्यातूनही लोकांनी व पोलीस कर्मचाऱयांनी धोका पत्करुन चहाच्या टपरीतील व गाडय़ावरील सिलिंडर टाक्या बाहेर काढल्याने काही प्रमाणात अनर्थ टळला. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. जळीत झालेले सर्वांची आर्थिक स्थिती बेताची असून या आगीने नुकसान झाल्याने ते कोलमडून पडले आहेत. या आगीचा धक्का सज्जाद हवलदार यांना सहन न झाल्याने त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना येथील डॉ.प्रविण पोरवाल यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
दरम्यान, ही आग अटोक्यात आणण्यासाठी नगरपालिकेचे अग्निशमन बंब उशिरा पोहचले. त्यामुळे आग अधिकच भडकत जावून चार दुकान गाळे भक्ष्यस्थानी पडले असून जळीत ग्रस्तांना जिल्हाधिकारी यांनी तात्काळ मदत द्यावी, तसेच ही आग कशामुळे लागली, याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी माजी नगरसेवक व विकास आघाडीचे अध्यक्ष विक्रम पाटील यांनी केली आहे.
ईद दिवशीच मुस्लीम बांधवांना फटका
मंगळवारी सकाळी सज्जाद हवलदार, मोसीन मुल्ला हे रमजान ईदच्या सणात आनंदाने सहभागी झाले होते. ते नमाज पठणात व्यस्त असतानाच ही आग लागली. हवलदार हे प्रामाणिक व कष्टाळू व्यापारी आहेत. उभारलेला दुचाकी खरेदी-विक्रीचा व्यवसाय आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे पाहून त्यांची प्रकृती अस्वस्थ बनली. या प्रकारानंतर त्यांना सावरण्यासाठी अनेक मुस्लिम बांधव धावून आले. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करतानाही मोठी गर्दी झाली होती. ईद †िदवशीच हा प्रकार घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.