महिलेसह तीघांवर गुन्हा दाखल
कोल्हापूर प्रतिनिधी
उसतोडणीचे मशिन देण्याच्या आमिषाने 22 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. चैतन्य सरनोबत, चंद्रलेखा सरनोबत (रा. दोघे नागाळा पार्क), रविंद्र हिंमत पाटील (रा. नवे पारगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयीतांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद उदय शामराव पाटील (वय 47 रा. नवे पारगाव ता. हातकणंगले) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली.
याबाबतची माहिती अशी, सरनोबत व पाटील यांनी उदय पाटील यांना ’एनडब्ल्यू रॅफटर’ या कंपनीच्या इक्वीपमेंटची डिलरशिप देतो तसेच उसतोडणी मशिन विक्री करुन त्या मशिनमागे 25 लाख रुपयांचा नफा मिळवून देतो असे अमिष दाखविले. यासाठी त्यांनी उदय पाटील यांच्याकडून जानेवारी 2019 ते 8 जून 2022 अखेर चेकव्दारे 20 लाख व रोखीने 2 लाख अशा प्रकारे 22 लाख रुपये घेतले. मात्र पाटील यांना मशिनही दिले नाही. तसेच साखर कारखान्याचा ठरलेला उसतोडणीचा करारही दिला नाही. उदय पाटील यांनी याबाबत या तिघांकडे विचारणा केली. मात्र या तिघांनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. यामुळे उदय पाटील यांनी याबाबतची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली.