ओबीसी आरक्षण नाही; अनेकांची गणिते जुळली; नव्या इच्छुकांना खुल्या पदाची लॉटरी
जगदीश पाटील गडहिंग्लज
गडहिंग्लज नगरपालिकेच्या निवडणूकीचे 11 प्रभागातील 22 जागाचे सोमवारी आरक्षण जाहीर झाले. प्रभाग 1 वगळता प्रत्येक प्रभागात प्रत्येकी एक जागा खुली राहिल्याने अनेकांचे गणिते जुळली आहेत. तर नव्या इच्छुकांना लॉटरी फुटल्याचा आनंद व्यक्त होतो आहे. खुल्या जागा वाढल्याने यावेळी निवडणूकी चांगलीच रंगणार असल्याचे संकेत आतापासून मिळताना दिसत आहेत.
गडहिंग्लज नगरपालिकेच्या सत्तेने दर 5 वर्षासाठी हेलकावे दिले आहेत. आरक्षणाची गणिते यावर सत्तेची गणिते मांडली जात होती. यावर्षी होणा-या निवडणूकीत 17 वरून नगरसेवकांची संख्या 22 वर पोहचली असून प्रभागाची संख्याही 7 वरून 11 वर गेली आहे. यावेळी इतर मागास प्रवर्गाचे आरक्षणाचे काढण्यात आले नसल्याने खुल्या जागा वाढल्या आहेत. याचा अर्थ खुल्या जागेवरून कुणालाही निवडणूकीला उभारता येणार आहे. प्रभाग 1 मधील पहिली जागा अनुसूचित जातीसाठी तर प्रभाग 8 मधील पहिली जागा अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव झाली आहे. उर्वरित सर्व जागा एकतर महिला अथवा खुली झाली आहे. त्यामुळे सर्वांना निवडणूकीचे मैदान मोकळे झाले आहे. फक्त लढणा-यांने आता आपली ताकद पनाला लावली पाहिजेत.
निवडणूकीच्या रिंगणात येण्यासाठी नव्या इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यांना हे आरक्षण पथ्यावर पडल्याचे दिसते आहे. कोठेही उभारता येते. त्यामुळे मोठया अडचणी दुर झाल्या आहेत. पुरूषाप्रमाणे प्रत्येक प्रभागात एक महिला निवडून येणार असल्याने सभागृहात किमान 11 महिला नगरसेविका निश्चित आहेत. त्यामुळे इच्छुक म†िहलांनीही पदर खोचून संपर्काला सुरूवात केल्याचे चित्र पहावयास मिळते. यावेळची निवडणूक राष्ट्रवादी, जनता दल, भाजपा, कॉग्रेस, शिवसेना या प्रमूख पक्षात लढली जाणार आहे. निवडणूकीत ब-याच जागा खुल्या झाल्याने रंगत वाढणार आहे. इच्छुकांनी संपर्काला सुरूवात केली असली तर अद्याप निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्या नाहीत. पण गणेशोत्सवच्या दरम्यान निवडणूका लागतील असे संकेत असल्याने त्यावर नजर ठेवत हालचाली सुरू झाल्या आहेत.
नगराध्यक्ष निवड
गेल्या निवडणूकीत नगराध्यक्ष हा थेट जनतेतून निवडला गेला होता. त्यामुळे निवडून आलेल्या 17 नगरसेवकांना 5 वर्ष उपनराध्यक्ष अथवा समितीच्या सभापतीपदाच्या पलिकडे उडी मारता आली नाही. यावेळी नगराध्यक्ष निवड ही नगरसेवकातून होणार असल्याने इच्छुकांनी नगरसेवक पदाचे पहिले मैदान मारत नगराध्यक्ष पदावर डोळा ठेवत पॅनेल रचनेतही हालचाली ठेवणे सुरू केल्याचे पहावयास मिळते आहे. नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची लॉटरी मात्र कशी असणार ? याकडे सा-यांचे लक्ष आहे.