प्रतिनिधी/गडहिंग्लज
शिंदेवाडी (ता. गडहिंग्लज) येथे कुत्र्याच्या गळय़ातील साखळीला हात लावला असता विजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू झाला. सौ. योगिता संदीप कदम (वय 38) असे मयत महिलेचे नाव आहे. गुरुवारी सकाळी 8.30 च्या दरम्यान ही दुर्घटना घडली.
इलेक्ट्रीक सर्व्हीस वायर नादुरुस्त होती. ही सर्व्हीस वायर लोखंडी ऍंगलला लागली होती. या अँगलला घरातील कुत्रा लोखंडी साखळीने बांधला होता. कुत्र्याच्या गळ्य़ात चामडी पट्टा असल्याने कुत्र्याला शॉक लागला नाही. कुत्रा ओरडू लागल्याने योगिताने कुत्र्याच्या गळ्य़ातील लोखंडी साखळी काढून कुत्रे सोडले. या साखळीत विजेचा प्रवाह उतरला होता. साखळी योगिताच्या हातात राहिल्याने जोराचा शॉक लागला. घरच्यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर तिला तातडीने उपचारासाठी गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. पण उपचारापुर्वी मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱयांनी सांगण्यात आले. याची वर्दी प्रकाश कदम यांनी गडहिंग्लज पोलिसात दिली आहे. अधिक तपास हवालदार अरुण पाटील हे करत आहेत. मयत योगिताच्या पश्चात पती, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे.