Tarun Bharat

KOLHAPUR; जिल्ह्यातील अस्सल सोनं बेन्टेक्स होणार! खासदार मंडलिक, माने शिंदेशाहीत दाखल होण्याची चिन्हे

Advertisements

कोल्हापूर(हमीदवाडा)
जिल्हय़ाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर खासदार संजय मंडलिक यांनी राज्याच्या राजकारणात शिंदे गटाला बळ द्यावे. पुढील राजकीय वाटचालीत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जावे, अशी मागणी हमीदवाडा येथील मेळाव्यात मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांनी केली. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव खासदार मंडलिक शिंदे गटासोबत जाण्याचे संकेत असून त्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत. दरम्यान खासदार धैर्यशील माने नॉट रिचेबल असल्यामुळे त्यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. चार दिवसापूर्वी शासकीय विश्रामगृहात खासदार मंडलिक यांनीच शिवसेनेत राहिलेत ते अस्सल सोनं, तर शिंदे गटात गेलेल्यांना बेन्टेक्स म्हंटले होते. त्यामुळे राहिलेले अस्सल सोने देखील बेन्टेक्स होणार अशी चर्चा कालदिवसभर कोल्हापूर जिल्ह्यात होती.

मंडलिक गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा रविवारी मंडलिक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड. वीरेंद्र मंडलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत हमीदवाडा येथे मेळावा झाला. मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांनी खासदार मंडलिक यांनी शिंदे गटासोबत जावे, अशी सर्वानुमते मागणी केली. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी अतुल जोशी होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर कोरोना महामारी आणि महापुराच्या कारणाने खासदारांचा निधी गोठवल्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना जनतेला विकासकामे दाखवावी लागणार आहेत. राज्यात शिंदे यांचे सरकार तर केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील गावांचा विकास साधण्यासाठी खासदार मंडलिक यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत जावे, असा सूर बहुतांश प्रमुख कार्यकर्त्यांनी मेळाव्यामध्ये धरला.

तसेच शिवसेना आणि ठाकरे परिवाराबद्दल नेहमीच आदर असणार आहे. मात्र केवळ सहानुभूतीतून आगामी राजकारण करता येणार नाही. आता भरगच्च निधी घेऊनच जनतेसमोर जावे लागेल. याकरीता भविष्याच्या राजकारणाच्या दृष्टीने खासदार मंडलिक यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या बाजूने आपले बळ लावावे, असाही आग्रह बहुतांश कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

विकासकामांशिवाय पर्याय नाही

नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी मुरगूडसाठी विकास निधी एकनाथ शिंदे यांच्याकडून मिळाल्याचे सांगून मतदारसंघाचा विकास व्हायचा असेल तर विकासाच्या मुद्यावर शिंदे गटाबरोबर राहण्याचा विचार मांडला. विकासाच्या गंगेला खीळ बसल्यामुळे आता निधीशिवाय पुढे राजकारण करणे अवघड असल्याचेही त्यांनी सांगितले

आगामी निवडणुका ताकदीने लढवूया

वीरेंद्र मंडलिक यांनी कागल व मुरगूड नगरपालिका तसेच जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका मंडलिक गटाच्यावतीने ताकदीने लढवण्यासाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले.

शिंदे गटासोबत जाण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह
मेळाव्यामध्ये आर. डी. पाटील (कुरुकली), माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके (मुरगूड), एन. एस. चौगुले (सोनाळी), आनंदराव फराकटे (फराकटेवाडी), अनिल सिद्धेश्वर (कुरणी), भगवान पाटील (बानगे), जयवंत पाटील (कुरुकली), सुधीर पाटोळे (एकोंडी), सत्यजित पाटील (सोनाळी) आदी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री शिंदे गटाबरोबर जाण्याचा आग्रह धरला.

उद्धव ठाकरेंच्या पाठीशी रहावे
मेळाव्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा आग्रह धरला असताना हणबरवाडीचे कार्यकर्ते दत्ता कसलकर यांनी मात्र खासदार संजय मंडलिक यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी रहावे, अशी स्पष्ट भूमिका मांडली.

मंडलिकांचे मन वळविण्याची जबाबदारी वीरेंद्र यांची
बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती व कार्यकर्त्यांचा सूर संजय मंडलिक यांच्यापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी त्यांचे चिरंजीव वीरेंद्र मंडलिक यांच्याकडे या बैठकीमध्ये सोपविण्यात आली.

Related Stories

चुकीच्या इंपिरीकल डेटामुळे असंतोष निर्माण होऊ शकतो : देवेद्र फडणवीस

Abhijeet Khandekar

भीमा कोरेगाव प्रकरण : शरद पवारांची तिसऱ्यांदा नोंदवली साक्ष

Abhijeet Shinde

ठेकेदाराचे अजब गजब कार्य

Patil_p

प्रशिक्षणाच्या नावाने ‘बार्टी’ मध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार : अमोल वेटम

Sumit Tambekar

कोल्हापुरात १० कार फोडल्या, राजवाडा पोलिसांनी स्वप्नील तावडे या युवकाला घेले ताब्यात

Abhijeet Khandekar

चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

Patil_p
error: Content is protected !!