कसबा बीड/ प्रतिनिधी
करवीर तालुक्यातील कसबा बीड या परिसरामध्ये पाडळी खुर्द, कोगे, महे, सावरवाडी, गणेशवाडी, शिरोली दुमाला, सावर्डे दुमाला, चाफोडी आदी भागातील सर्व ग्रामपंचायत, विकास सेवा संस्था, पाणीपुरवठा संस्था, पतसंस्था, आरोग्य उपकेंद्र इत्यादी ठिकाणी स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यामुळे अमृत महोत्सव दिन म्हणून मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.
कोगे तालुका करवीर या गावांमध्ये निवृत्त सैन्य दलामधील हवालदार भाऊसो सखाराम पवार यांच्या हस्ते राजाराम नागरी बिगर पतसंस्था व आरोग्य उपकेंद्र कोगे येथे ध्वजारोहण करण्यात आला. वयाच्या अठराव्या वर्षी कुस्ती खेळामधून दलामध्ये भरती झालेले भाऊसो पवार यांनी बॉक्सिंग गेम मधून नॅशनल व इंटरनॅशनल स्पर्धेमधून कोगे गावाचे व देशाचे नाव गाजवले होते. देशाच्या सेवेमध्ये असताना पुणे, राजस्थान, पंजाब, आसाम, हिमाचल प्रदेश, हरियाणा,जम्मू काश्मीर राष्ट्रीय रायफल आधी ठिकाणी त्यांनी देश सेवा बजावली.
तसेच ग्रामपंचायत कोगे येथील ध्वजारोहणाचा कार्यक्रम गावचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य विश्वास दत्तात्रय पाटील यांच्या हस्ते व कुमार आणि कन्या विद्या मंदिर कोगे येथील ध्वजारोहण निवृत्त सैनिक शामराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कोगे ग्रामपंचायत सरपंच सौ.अंबुताई पाटील, उपसरपंच बाजीराव निकम, सर्व आजी व माजी विद्यमान सदस्य, राजाराम नागरी पतसंस्थेचे चेअरमन बळीराम चव्हाण व सर्व संचालक मंडळ, ग्रामीण आरोग्य केंद्राचे सर्व अधिकारी वर्ग, आरोग्य सेवक आशा अंगणवाडी सेविका, शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी ग्रामस्थ उपस्थित होते.
त्याचबरोबर ‘हर घर तिरंगा ‘या उपक्रमाचा गावातील सर्व ग्रामस्थांनी आपल्या घरावरती तिरंगा ध्वज लावून देशाचा स्वातंत्र्य अमृत महोत्सव दिन मोठ्या उत्साहात संपन्न केला.