Tarun Bharat

हिंदूहृदयसम्राट…भाजपच्या पोस्टरवर; बाळासाहेब ठाकरे यांच्या छबीचा चतुराईने वापर

हिंदूत्वाचा समान धागा, महाराष्ट्रधर्माचा समाज जागा झाल्याचाही संदेश देण्याचा भाजप नेत्यांचा प्रयत्न

संजीव खाडे कोल्हापूर

एकनाथ शिंदे यांच्या बंडाला प्रोत्साहन, ताकद देत शिवसेनेला सुरूंग लावण्यात भाजपचे नेते यशस्वी झाले. ठाकरे यांचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी बसले. शिवसेनेच्या नेतृत्वाला बाजूला ठेवून आणि शिवसेनेच्या आमदारांना बरोबर घेऊन हिंदूत्वाच्या विचाराचे सरकार राज्यात सत्तेवर आल्याचा दावा करणाऱ्या भाजपला हिदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाच आधार घ्यावा लागत आहे. राज्यातील सत्तांतरानंतर भाजपने स्वागत आणि अभिनंदनाची राज्यभर जी पोस्टर्स लावली आहेत, त्यामध्ये ‘समान धागा हिंदूत्वाचा’ या टॅगलाईनखाली बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र छापताना भाजपने चतुराईने शिवसेनेच्या हिंदूत्ववादी समर्थक आणि मतदारांना साद घातली आहे. या पोष्टरची चर्चा आता सर्वसामान्यांसह राजकीय वर्तुळातही रंगू लागली आहे.

अधिक वाचा- नव्या सरकारच्या खातेवाटपात महत्त्वाची खाती भाजपकडेचं?

राज्यात गेल्या पंधरा वीस दिवसातील राजकीय घडामोडी आणि राजकीय भूकंपाचे पयर्वसन सत्तांतरात झाले. शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या चाळीस आमदारांनी स्वतंत्र गट स्थापन करताना आम्ही शिवसेना सोडली नसल्याचा केलेला दावा आणि त्यानंतर ठाकरे यांची शिवसेना खरी की शिंदे गटाची शिवसेना खरी यावरून राजकारण सुरू झाले आहे. विधानसभेत शिंदे गटाकडे ठाकरे यांच्या तुलनेत जादा आमदार असले तरी शिवसेना पक्ष संघटनेवर उद्धव ठाकरे यांचे वर्चस्व आहे. आगामी काळात न्यायालयीन लढाईनंतर बऱयाच गोष्टी स्पष्ट होणार असल्या तरी भाजपने मात्र आता पासून पुढील विचार करत आम्ही ठाकरे सरकार पाडले नाही तर हिंदूत्वाच्या समान धाग्यामुळे शिवसेनेचे आमदार आमच्याकडे आले. त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर असणारी अनैसर्गिक आघाडी सोडली. ही बाब भाजप पोस्टरव्दारे हिंदूत्ववादी विचाराचे समर्थक, शिवसेनेचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे मतदार यांच्यात बिंबविण्याचा प्रयत्न पोस्टरव्दारे केला आहे
भाजपने जी कोल्हापूर शहरासह राज्यभर जी पोस्टर झळकविली आहेत, त्यातील मजकूर हिंदूत्वाचा धागा, जुने ऋणानुबंध, महाराष्ट्रधर्म याबाबत संदेश देणारा आहे. हा संदेश देताना हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदूत्ववादी विचार, त्यांच्याशी असणारा पूर्वीपासूनचा ऋणानुबंध यांना कुठेतरी कमळाशी जोडण्याचा भाजपच्या नेत्यांनी चतुराईने प्रयत्न केला आहे. ठाकरे यांचे महाविकास आघाडी सरकार आम्ही पाडले नाही तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदूत्ववादी विचाराचे सरकार आम्ही त्यांच्या आमदारांच्या साथीने राज्यात स्थापन केले, असा संदेश देण्याचा प्रयत्न भाजपने पोस्टरच्या माध्यमातून केला आहे. पोस्टरवरील मजकुराचे अनेक राजकीय अर्थ निघू शकतात. बाळासाहेब ठाकरे यांचा मराठी माणूस, महाराष्ट्र धर्म या आग्रही भूमिका आणि विचाराचाही उल्लेख करताना भाजपने शिवसेनाप्रमुखांचा विचार मानणाऱया मतदारांना आणि शिवसैनिकांशीही जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आहे. या चतुराईत शिंदे अणि फडणवीस यांचे अभिनंदन करताना पोष्टरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे फोटो आहेत.

हिंदूहृदयसम्राटांशेजारी धर्मवीर
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटो शेजारी शिवसेनेचे दिवंगत नेते व मुख्यमंत्री शिंदे यांचे गुरू आनंद दिघे यांचा फोटो या पोस्टरवर लावण्यात आला आहे. दिघेंना ठाणेकरांनी धर्मवीर पदवी दिली होती. हिंदूहृदयसम्राट आणि धर्मवीर यांना जवळ-जवळ आणून शिवसेनेला मानणाऱया हिंदूत्ववादी मतदारांना लुभावण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना किती प्रतिसाद मिळतो, हे नजीकच्या काळात ठरणार आहे.
भाजपच्या पोस्टरवरील कल्पक मजकूर
‘समान धागा हिंदूत्वाचा’…..
ऋणानुबंध जुने….
वाटचाल नवी….,
समाज जागा
महाराष्ट्रधर्माचा !
महाराष्ट्राच्या प्रगतीला… गती नवी !

Related Stories

बाऊन्सर्सचा निर्णय सर्वस्वी जिल्हाधिकाऱयांचा

Patil_p

कोल्हापूर जिल्हय़ात 2 बळी, 35 पॉझिटिव्ह

Archana Banage

गव्याच्या हल्ल्यात महिला जखमी

Archana Banage

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त साकारली पाषाण खडीपासून कलाकृती

Archana Banage

आशा, गटप्रवर्तकांचे प्रश्न मार्गी लावू; मंत्री मुश्रीफांचे शिष्टमंडळाला आश्वासन

Archana Banage

नवी दिल्ली येथे मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक दाखवणाऱ्या मावळ्यांचा सत्कार

Abhijeet Khandekar