आत्महत्येचा बनाव, पोलीस तपासात निष्पन्न
म्हासुर्ली/प्रतिनिधी
धामणी खोऱ्यातील कोनोली पैकी पानारवाडी (ता. राधानगरी) येथे पती सतत दारू पिऊन त्रास देत असल्याच्या कारणावरुन पत्नीने दोरीच्या सहाय्याने गळा आवळून पतीचा खून केल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गणपती आनंदा कानडे (वय-३९ ) असे खून झालेल्या पतीचे नाव असून आरोपी पत्नी गीता कानडे (वय -३०) हिला राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गुरुवारी संध्याकाळी मृताची पत्नी गीता हिने पती गणपती याने तुळईला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांना सांगितले होते. मात्र पोलिसांनी अधिक चौकशी केली असता गणपती याचा खून झाल्याचे शुक्रवारी उघड झाले.
गुरुवारी पती-पत्नीत दारू पिण्याच्या कारणावरून वाद झाला होता. वाद दाढत गेल्याने पत्नी गीताने याचा राग मनात धरुन घरातील जेवण खोलीत दोरीने पती गणपतीचा गळा आवळून मारल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी घटनास्थळी गुन्ह्यासाठी वापरलेल्या वस्तू जप्त केल्या आहेत. दरम्यान घटनास्थळी डीवायएसपी साळुंखे यांनी भेट देऊन पाहणी केली. तर पोलीस निरीक्षक नजीर खान यांनी फिर्याद दिली. राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक घाडगे, अनुराधा पाटील, पो.कॉ. बजरंग पाटील यांनी घटनास्थळी भेटी देऊन खून प्रकरण उघडकीस आणले.