Kolhapur: कोल्हापूर विमानतळाचा उडान योजनेमध्ये समावेश झाल्यानंतर सर्वप्रथम सुरू झालेली अलायन्स एअर या सरकारी मालकीच्या कंपनीची कोल्हापूर-हैदराबाद या मार्गावरील विमानसेवा आज (ता. २४) पासून अनियमित कालावधीसाठी बंद राहणार आहे. कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थेमधील त्रुटी असल्याने ही सेवा बंद करण्यात येत असल्याचे माहिती समोर येत आहे. याबाबात कंपनीने संबंधित विभागांना अधिकृतरीत्या कळविले आहे. ९ डिसेंबर २०१८ पासून सुरू झालेली कोल्हापूर-हैदराबाद विमानसेवा बंद झाल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.
सुरुवातीला कोल्हापूर-हैदराबाद विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळाल्याने अलायन्स एअरने बंगलोर विमानसेवा सुरू केली होती. त्यामुळे अलायन्स एअर या कंपनीची कोल्हापूर विमानतळावरून दोन मार्गांवर विमानसेवा सुरू होती. हैदराबाद विमानसेवा बंद होण्याअगोदर बेंगलोर मार्गावरील विमान सेवाही ३० मार्चपासून बंद केली आहे. आता कोल्हापूर विमानतळावरून हैदराबाद मार्गावरील विमानसेवा बंद झाल्याने अलायन्स एअरची विमानसेवा पूर्ण बंद झाली आहे.
दोनच कंपन्यांची विमानसेवा
अलायन्स एअर कंपनीची विमानसेवा बंद झाल्यामुळे इंडिगो एअरलाइन्स व स्टार एअरलाइन्स या दोनच कंपन्यांची हैदराबाद,मुंबई व तिरुपती या मार्गावरील विमानसेवा सुरू राहणार आहेत. तर इंडिगो एअर लाईन्सची सेवा 28 ऑक्टोबर पासून रविवार,सोमवार,बुधवार आणि शुक्रवार सुरु होणार आहे.


next post