पर्यावरण प्रेमीच्या सर्तकेमुळे उघडकीस आला प्रकार; चौघाविरोधी पोलिसात गुन्हा दाखल
इचलकरंजी प्रतिनिधी
शहरातील गोंदकर मळ्यातील गट नंबर 683 पैकी 3 मधील जागेवरील सुमारे 99 मोठ्या बांभळीच्या झाडांची अवैधपणे कत्तल करण्यात आली. बेकायदा वृक्ष तोडीचा हा प्रकार शहरातील पर्यावरण प्रेमी नागरिकांच्या सर्तकतेमुळे उघडकीस आला असून, याप्रकरणी नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक व बाग पर्यवेक्षक संपत चव्हाण यांनी पोलिसात मंगळवारी तक्रार दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी वृक्ष तोड ठेकेदार अभिजीत शामराव वडिंगे (रा. मंगळवार पेठ, इचलकरंजी) आणि त्यांचे अन्य तीन अनोळखी सहकारी व्यक्तीच्या विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरात वृक्षसंपदा वाढावी याकरीता सामाजिक संघटनाकडून वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न होत आहेत. दुसरीकडे वृक्षांची दिवसा ढवळ्या अवैधपणे तोड केली जात आहे. अशीच शहरातील सांगली रोडवरील गोंदकर मळ्यातील गट नं. 683 पैकी 3 मधील कापड उद्योजक मनिष सत्यनारायण मानधने, योगेश सत्यनारायण मानधने, लतीफ मिरासो गैबान, रिदवान मिरासो गैबान, रेश्मा फिरोज शिरगावे, शहिदा शहनाज शिरगावे यांच्या मालकीच्या जागेवरील बांभळीची झाडे अभिजीत शामराव वडिंगे (रा. मंगळवार पेठ, इचलकरंजी) आणि त्यांचे तीन अनोळखी सहकारी कटर मशीनच्या तोडत होती. हा प्रकार पर्यावरण प्रेमी संतोष हत्तीकर रा. विवेकानंद कॉलनी, इचकरंजी) यांच्या निदर्शनास आला. त्यांनी घटनास्थळी धाव घेत वडिंगे यांच्याकडे वृक्ष तोडण्याबाबत नगरपालिकेची परवानगी घेवून, वृक्षाची तोड करीत आहात का ? यांची विचारणा केली असता त्यांने विना परवाना वृक्षाची कत्तल करीत असल्याचे सांगितले. त्यावरुन पर्यावरण प्रेमी हत्तीकर यांनी याविषयी नगरपालिकेकडे तक्रार दाखल केले. त्यावरुन नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक व बाग पर्यवेक्षक संपत चव्हाण सहकारांच्या समवेत घटनास्थळी दाखल झाले. त्यांना या ठिकाणी सुमारे 2 फुट ते 10 फुट घेर असलेली 99 बांभळीच्या वृक्षांची कत्तल करण्यात आलेली दिसून आले. त्यांनी वृक्षांची तोड करुन, पर्यावरणाला हानी पोहचविण्याऱ्या संबंधीत वडिंगे ठेकेदारांसह त्यांच्या सहकाऱ्यांची चांगलीच कान उडाणी करीत, विना परवाना वृक्षांची सुरु असलेली तोडीचा घटनास्थळाचा पंचनामा करुन, अहवाल तयार केला. तो अहवाल नगरपालिकेचे मुख्याधिकार्यांना सादर केला. त्यांच्या आदेशाने मंगळवारी दुपारी बांभळीच्या झाडाची बेकायदेशिरपणे कत्तल केल्याप्रकरणी अभिजीत वडिंगेसह अन्य तीन अनोळखी व्यक्तीविरोधी तक्रार दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी या चौघाविरोधी महाराष्ट्र नागरी क्षेत्रे झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 चे कलम 21 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
बिल्डरच्या बंगल्यात वृक्ष तोडीची फुटली सुपारी
गोंदकर मळ्यातील गट नंबर 683 पैकी 3 मधील जमीन शहरातील बडय़ा कापड उद्योजक आणि बिल्डरच्या नावे आहे. त्यांच्या जमिनीवरील बांभळीची झाडे तोडण्याबाबतचा ठेका नगरपालिकेचा एका मक्तेदारांने घेतला असून, या वृक्ष कत्तलीची 21 हजारांची सुपारी जमीन मालक एका बिल्डरच्या बंगल्यात फुटली आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली. सुपारी घेतलेल्या त्या संबंधीत नगरपालिका ठेकेदारांने या वृक्षाची तोड करण्याचे काम अभिजीत वडिंगे याला दिल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे.