पुलाची शिरोली / वार्ताहर
रॅम अंगावर पडून गंभीर जखमी झालेला तानाजी तात्यासाहेब पाटील वय वर्षे ४२, यांचे रविवारी सकाळी उपचार सुरू असताना निधन झाले. हि घटना शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता शिरोली औद्योगिक वसाहतीतील नागाव फाटा येथील एका मोठ्या कारखान्यात घडली.
या बाबत मिळालेली माहिती अशी की, तानाजी पाटील हा ठेकेदारामार्फत नागाव फाटा येथील कोल्हापूर स्टील या कंपनीत नोकरीला होता. शुक्रवारी सकाळच्या पाळीत फर्नेस भट्टी फौंन्ड्री विभागात रॅम मशिनवर काम करत असताना रॅमला लाॅक लावला असे समजून त्यांने मशीन सुरू केले असता क्षणार्धात सुमारे एक ते दीड टनाची रॅम लॅडल जवळ उभा असलेल्या तानाजीच्या अंगावर पडून तो गंभीर जखमी झाला.
त्याला तत्काळ कोल्हापूरातील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. पण त्याचे शरीर डॅमेज झाल्यामुळे उपचारास त्याचा प्रतिसाद मिळाला नाही. अखेर रविवारी सकाळी नऊच्या सुमारास तो मयत झाला.
तानाजी हा माजी सरपंच तात्यासाहेब पाटील यांचा मुलगा असुन त्याच्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण कुटुंबावर दुखाःचा डोंगर कोसळला आहे. पश्र्च्यात आई वडील पत्नी दोन मुले भाऊ असा परिवार आहे. या घटनेची नोंद शिरोली पोलिस ठाण्यात अद्याप झालेली नसल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील यांनी सांगितले.