आमदार प्रकाश आवाडे यांचे राज्यपालांना पत्र, जि.प.प्रारुप प्रभाग रचना सदोष असल्याचा दावा
कोल्हापूर प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी हातकणंगले तालुक्यातील निश्चित केलेली प्रारुप प्रभाग रचना तयार करताना हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि हातकणंगलेतील काँग्रेसच्या आमदारांनी हस्तक्षेप केला आहे. त्यामुळे सदरची प्रारुप प्रभाग रचना सदोष असून त्यामध्ये कोणत्याही स्वरूपाची भौगोलिक संलग्नता नाही. त्यामुळे सदरची प्रारुप प्रभाग रचना रद्द करून भौगोलिक संलग्नतेचा विचार करून नवीन प्रभाग रचना करावी अशा मागणीचे पत्र आमदार प्रकाश आवाडे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिले.
पत्रात म्हटले आहे, राज्य निवडणूक आयोगामार्फत कोल्हापूर जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समिती गणांची नवीन प्रारुप प्रभाग रचना करण्याबाबत 10 मे 2022 रोजी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. त्यानुसार 23 मे पर्यंत प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यास सुचित केले आहे. मात्र हातकणंगले तालुक्यातील बारा जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये प्रभाग प्रारूप रचनेचे जुनेच नकाशे विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्याच्या हालचाली सुरु आहेत. जुन्या प्रारुप रचनेमध्ये तालुक्यातील आमदार, खासदारांनी त्यामध्ये हस्तक्षेप केला असून ती सदोष आहे. तसेच प्रारुप नकाशा हा राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार 23 तारखेनंतर प्रसिद्ध होणे अपेक्षित होते.मात्र तत्पुर्वीच हा नकाशा लोकप्रतिनिधींकडे गेल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाचा आणि गोपनियतेचा भंग झाला आहे. त्यामुळे सदरची प्रारुप रचना रद्द करून नवीन प्रारुप रचना सादर करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना आदेश द्यावेत, अशी मागणी आमदार प्रकाश आवाडे यांनी मागणी केली आहे.
तर उच्च न्यायालयात याचिका
हातकणंगले तालुक्यातील प्रारुप प्रभाग नकाशे हे राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार झालेले नाहीत. काही राजकीय लोकांनी आपल्याला सोईस्कर अशी प्रारुप प्रभाग रचना करण्यासाठी मंत्रालयातून अधिकाऱ्यांवर दबाव आणल्यामुळे जुनी प्रभाग रचना पूर्णपणे सदोष आहे. त्यामुळे भौगोलिक संलग्नग्नता नसलेल्या या प्रारुप रचनेच्या नकाशामध्ये जर बदल केला नाही, तर या त्या विरोधात जनआंदोलन उभे केले जाईल. तसेच उच्च न्यायालयात याबाबतची याचिका दाखल करणार असल्याचा इशारा आमदार आवाडे यांनी दिला आहे.