कबनूर वार्ताहर
कबनूर जिल्हा परिषद व तालुका पंचायत समिती निवडणूक रद्द करून स्वतंत्र नगर परिषद अस्तित्वात आणावी अशी मागणी कबनूर नगरपरिषद कृती समितीच्या वतीने राज्याचे निवडणूक अधिकारी व राज्याचे मुख्य सचिव नगर विकास मंत्रालय यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कबनुर, ता. हातकणंगले येथील वाढती लोकसंख्या व वाढता विस्तार पाहता कबनूर नगर परिषद होणे गरजेचे आहे. सध्या जिल्ह्यामध्ये कबनूर हे सर्वात मोठे गाव असून गावची लोकसंख्या सुमारे 60 हजारहून अधिक आहे. गाव मोठे असल्याने गावच्या मानाने कबनूर ग्रामपंचायतींला नागरी सुविधा उपलब्ध करून देणे अडचणीचे झाले आहे. कबनूर एक जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण झाले आहे. गाव मोठे असूनही कबनूर नगर परिषद अस्तित्वात आली नाही. गेली चार वर्षे झाले सामाजिक कार्यकर्ते दत्ता शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कबनूर नगरपरिषद कृती समितीची स्थापन करण्यात येऊन या कृती समितीच्या वतीने काही सामाजिक कार्यकर्त्यांनी हा लढा चालू ठेवला आहे. खासदार, आमदार, जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना यापूर्वीही पत्रे, निवेदने दिलेली आहेत. नगर परिषद होण्याबाबत मुख्य चौकात ही आंदोलन करण्यात आले होते. यापूर्वीही मंत्रालयात अनेक बैठका झाल्या आहेत. परंतु काही त्रुटी असल्यामुळे प्रस्ताव खाली आला. पुन्हा नव्याने प्रस्ताव तयार करून पाठविण्यात आला.
तदनंतर नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली होती. कबनूर नगरपरिषद होण्यासाठी शासन पातळीवर सकारात्मक विचार सुरू आहेत. त्यामुळे कबनूर गावची जिल्हा परिषद व तालुका पंचायत समिती निवडणूक रद्द करून स्वतंत्र कबनुर नगरपरिषद स्थापन करावी आणि त्यानंतर सार्वत्रिक निवडणुका घ्याव्यात असे देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे. याबाबतचे निवेदन राज्याचे नगरविकास राज्य सचिव, राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे , नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनाही देण्यात आले आहे.