कैद्यांचे धाडस वाढतेय…?
कोल्हापूर/प्रतिनिधी
कारवाई केल्याचा राग मनात धरुन कळंबा कारागृहातील एका कैद्याने मंगळवारी कारागृह अधीक्षक चंद्रमणी इंदूरकर यांच्यावरच हल्ला केल्याची घटना घडली. यामुळे कारागृहात खळबळ उडाली आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात या गुन्हय़ाची नोंद झाला आहे. संजय श्रीबेणी माधव मिश्रा असे संबंधित कैद्याचे नाव आहे.
रत्नागिरी कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या मिश्रा नावाच्या कैद्याला प्रशासकीय कारणामुळे 25 सप्टेंबर 2021 पासून कळंबा कारागृहात ठेवण्यात आले आहे. काही दिवसापूर्वी मिश्रा यांने दुसऱया कैद्याच्या पायावर पाय दिल्याने त्याच्यावर इंदूरकर यांनी कारवाई केली होती. हा राग त्याच्या मनात होता. या रागातून त्यांने बुधवारी सकाळी इंदूरकर यांच्यावर हल्ला केला. इंदूरकर हे तपासणीला गेले असता दबा धरुन बसलेल्या मिश्रा यांने पत्र्याच्या तुकडय़ाने त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी इंदूरकर वेळीच सावरले असले तरी त्यांच्या गळयाला आणि हाताला जखम झाली आहे. याप्रकरणी मिश्रा याच्या विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे तपास करत आहेत.
अधीक्षकांवरील हल्ला गंभीर बाब
कळंबा कारागृहात अंमली पदार्थ, शस्त्र जाणे हे नवीन नाही. एका कैद्याकडून दुसऱ्या कैद्यावर हल्ले झाले आहेत. एका कैद्याचा तर खूनही झाला असून जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तो गुन्हा दाखल आहे. कैद्याकडून कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र आता थेट कारागृह अधीक्षकांवरच हल्ला झाल्याने कारागृहात कोणीच सुरक्षित नाही हे या हल्ल्याच्या निमित्ताने सिध्द झाले आहे.