कुदनूर / प्रतिनिधी
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. पराग अशोक वर्पे (२८) असे त्या मृत तरुणाचे नांव असून, याबाबत त्याच्या वडिलांनी कोवाड पोलिसात वर्दी दिली आहे.
पराग याने घरात कोणी नसताना आपल्या खोलीमधील स्लॅबच्या हुकास दोरीने गळफास लाऊन घेतला. ही घटना सोमवार दि. २ मे रोजी सायंकाळी ४.३० ते ९.३० या वेळेत घडली असून, मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे परागला उठवायला त्याचे वडील गेले असता त्याने दरवाजा उघडला नाही. तसेच वडिलांच्या हाकेला उत्तर मिळत नसल्यामुळे दरवाजा तोडून पाहिले असता परागने गळफास लाऊन घेतल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच कोवाड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या पश्चात आई, वडील, विवाहित बहीण असा परिवार आहे. परागने दारुच्या नशेत गळफास घेतला असून, गळफासाचे कारण अद्याप समजू शकले नाही. कोवाड पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.