14 दिवसांत सत्तरहून अधिक रूग्ण उपचारार्थ; 60 वॅटपेक्षा अधिक क्षमतेच्या लेसरने डोळयांना डॅमेज
कोल्हापूर प्रतिनिधी
गणेशोत्सवात आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत साऊंड सिस्टीमच्या मर्यादेला पोलिसांना आळा घालता आला, पण लेसर शोचा झगमगाट मात्र सुरूच राहिला. लेसर शोच्या लखलखाटात न्हावून निघालेल्या तरूणाईत आता नेत्रविकार दिसून येत आहेत. गेल्या 14 दिवसांत डोळय़ाच्या विकाराशी निगडीत सत्तरहून अधिक रुग्ण दाखल झाले आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिरवणुकीतील लेसरचा प्रकाशझोत त्यांना चांगलाच महागात पडला आहे. नेत्ररूग्णांत झालेल्या वाढीला डोळे दिपवणारा प्रकाशझोत कारणीभूत ठरल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
अधिक वाचा- रात्री 12 नंतर साउंडसिस्टीम लावली; 13 जणांवर गुन्हा दाखल
यंदाच्या गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकीमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला तो लेसर शो. या लेसर शोमधील डोळे दीपवणारे विविधरंगे झोत पाहणाऱयांनाही त्रासदायक ठरले आहेत. उत्साहात लेसर शो आनंद तरूणाईसह आबालवृद्धांनी लुटला. पण आता हाच लेसरचा प्रकाश डोळय़ांसाठी धोकादायक बनला आहे. गणेशोत्सवात शहरात नेत्रविकार वाढल्याचे चित्र समोर आले आहे.
कोल्हापूर जिल्हा नेत्र संघटनेच्या माहितीनुसार गेल्या 14 दिवसात सत्तरहून अधिक जणांच्या डोळ्याला लेसर शोमुळे इजा पोहोचली आहे. मिरवणुकीत मोठय़ा प्रमाणातील लेसर शोचा झगमगाट नियंत्रणाबाहेर होता. तरीही या झगमगाटाचा आनंद तरूणाईने लुटला. गणेशोत्सवाच्या आगमन ते विसर्जन अन् त्यानंतरच्या दोन दिवसांत डोळे चुरचुरणे, लाल होणे, डोळयांतून पाणी येणे, डोळय़ांना सुज येणे अशा लक्षणांच्या रूग्णांत वाढ झाल्याची माहिती नेत्रविकारतज्ञांनी दिली.
सध्या साऊंड सिस्टीमसोबत लेसर शोचं फॅड वाढले आहे. मिरवणुका आकर्षक बनवण्यासाठी अति तीव्र लेसर किरणांचा वापर वाढला आहे. लेसरमधून बाहेर पडणारी अति तीव्र किरणे पाहणाऱयांसाठी धोक्याची ठरत आहेत. लेसरच्या वापरात थोडी जरी चूक झाली तरी त्याचे गंभीर परिणाम मानवी शरीरावर होतात, त्यामुळे लेसरच्या उपकरणांवर इशारा देणाऱया सूचना दिलेल्या असतात. आता अशाच लेसरचा सर्रास वापर उत्सवांतील मिरवणुकांमध्ये केला जात आहे. गणेशोत्सवातील मिरवणुकांत लेसर शोचा वाढलेला वापर आता डोळय़ाच्या आरोग्याशी निगडीत प्रश्न निर्माण करत आहे. लेसरची तीव्र घातक किरणे डोळ्यावर इजा करत आहेत. लेसर किरणांची क्षमता दहा वॅटपेक्षा जास्त वाढवू नये, एकाच ठिकाणी लेसर किरण केंद्रित ठेवू नयेत, नाजूक त्वचा व डोळ्यांना इजा पोहोचू नये, अशाप्रकारे लेसर किरणांचा वापर करावा, अशा सूचना कंपन्यांनी दिल्या आहेत. पण प्रत्यक्षात त्या पाळल्या न गेल्याने आगमन व विसर्जन मिरवणुकीतील लेसर शोचा झगमगाट अनेकांना नेत्रविकारातून महागात पडला आहे. 14 दिवसांत नेत्रविकार रूग्णांची संख्या 70 वर पोहोचल्याने लेसर शोचा झगमगाट नकोच.. अशी प्रतिक्रिया त्रास झालेल्या तरूणांतून व्यक्त होत आहे.
गणेशोत्सवादरम्यान नेत्ररूग्णांत वाढ झाली आहे. त्यातही 60 वॅटपेक्षा अधिक क्षमतेच्या लेसरमुळे अनेकांच्या डोळय़ांना इजा झाली आहे. त्यात डोळयांसमोर वर्तुळे दिसणे, काळे डाग दिसणे, रेटिनोमागे रक्तस्त्राव अशी गंभीर लक्षणे दिसून आली आहेत. आतापर्यत 70 हून अधिक अशा रूग्णांवर उपचार सुरु आहेत.
डॉ. अभिजित ढवळे, नेत्रविभागप्रमुख सीपीआर