ग्रामस्थांकडून जीवदान, अधिक उपचारासाठी कोल्हापूर मध्ये दाखल
म्हासुर्ली /प्रतिनिधी
म्हासुर्ली (ता.राधानगरी) येथे रविवारी रात्री जंगलातून सैरभैर होऊन म्हासुर्ली – धामोड रस्त्यावर आलेल्या गाभण भेकर प्राण्यास अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झाले.वन कर्मचाऱ्यांनी जखमी भेकरास उपचारासाठी अगोदर राधानगरी व त्या नंतर कोल्हापूर येथे दाखल केले आहे.
म्हासुर्ली – धामोड या मुख्य मार्गावरील शिवार नावाच्या शेत परिसरात रविवारी रात्री दुर्मिळ समजला जाणारा भेकर प्राणी सैरभैर होऊन जंगलातून रस्त्यावरून आला असता अज्ञात वहानाने जोराची धडक दिली.यामध्ये भेकर गंभीर जखमी झाले. अपघातात त्याच्या पोटास,तोंडास मोठी दुखापत झाल्याने नाका तोंडातून रक्तस्राव होत होता.
याच वेळी रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या लोकांना सदर भेकरास अपघात झाला असल्याचे दिसून आल्याने त्याला रस्त्यावरुन बाजूला घेऊन म्हासुर्ली वन परिमंडळ क्षेत्रातील वन कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला.तसेच प्रथम स्थानिक पशु वैद्यकास संपर्क करत भेकरावर प्राथमिक उपचार करण्यात आले.सदर भेकर मादी जातीचे असून ते गाभण असल्याचे निदर्शनास आले.वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्यावर जखमी भेकरास त्यांच्या ताब्यात देण्यात आले.
त्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी जखमी गाभण भेकरास राधानगरी येथे अधिक उपचारासाठी दाखल केले.मात्र रात्रभर भेकराच्या तब्येतीमध्ये योग्य त्या सुधारणा न झाल्याने सोमवारी सकाळी सदर भेकरास अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे दाखल केले आहे.
सदर दुर्मिळ आशा भेकराचे प्राण वाचविण्यासाठी म्हासुर्ली वनपरिमंडळाच्या वन कर्मचाऱ्यांसह पशुवैद्यकीय डॉ.संजय सुतार, मंगेश आठल्ये,सदाशिव कांबळे,अरमान मलकापूरे, तुकाराम चौगले, समाधान परीट, यांचे मोलाचे सहकार्य लाभले लाभले.